आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची शानदार विजयी घोडदौड सुरू आहे. या वाटचालीत भारताने पाकिस्तानलाही नामोहरम केले आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ हा अनपेक्षित खेळासाठी ओळखला जातो. त्यामुळे रविवारी अव्वल चार संघांच्या फेरीत दुसऱ्यांदा पाकिस्तानला सामोरे जाताना भारताचे पारडे जड मानले जात आहे. परंतु पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता असेल.

भारताने तीन सामन्यांपैकी तीन विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवण्याकडे कूच केली आहे, तर पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धचा मानहानीकारक पराभव जेमतेम टाळला आहे. आशिया चषकात भारताला हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवताना झगडावे लागले होते. मग तीन दिवसांपूर्वी भारताने गटसाखळीत पाकिस्तानवर आठ विकेट राखून विजय मिळवला. शुक्रवारी भारताने बांगलादेशचा आरामात पराभव केला.

भारताच्या दृष्टीने कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सलामीवीर फॉर्मात आहेत. रोहितने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक साकारले होते, त्यानंतर बांगलादेशविरुद्ध ८३ धावांची खेळी उभारली. मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी उत्सुक आहेत. रायुडूने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३१ धावा केल्या होत्या.

अनुभवी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशविरुद्धच्या लढतीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत ३७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या. केदार जाधव आपल्या अष्टपैलुत्वाची चुणूक दाखवत आहे. एक वर्षांनंतर भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवू शकणाऱ्या रवींद्र जडेजाने बांगलादेशविरुद्ध चार बळी घेत लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानला या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीला सामोरे जाण्याचे आव्हान असेल.

भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान माऱ्यात प्रतिस्पर्धी संघावर अंकुश ठेवण्याची क्षमता आहे. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे प्रमुख फिरकी गोलंदाज दिमतीला आहेत, तर केदारची कामचलाऊ फिरकीसुद्धा प्रभावी ठरते.

पाकिस्तान संघाची मदार अनुभवी शोएब मलिकवर आहे. अष्टपैलू मलिकने भारताविरुद्ध ४३ धावा काढल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी अफगाणिस्तानविरुद्ध महत्त्वाची खेळी साकारत त्याने पाकिस्तानला विजय मिळवून दिला. मागील वर्षी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताविरुद्ध सामना जिंकून देणारी शतकी खेळी झळकावणारा सलामीवीर फखर झमान अपयशी ठरत आहे. मात्र बाबर आझम, सर्फराझ अहमद आणि इमाम उल हक यांच्यावर पाकिस्तानची मदार असेल. वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा फॉर्म ही पाकिस्तानसाठी आणखी एक महत्त्वाची चिंता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता. या परिस्थितीत हसन अली आणि उस्मान खान यांनी वेगवान माऱ्याची धुरा सांभाळण्याची आवश्यकता आहे.

देशातील सर्वोच्च प्रतिष्ठेचे क्रीडा पुरस्कार केंद्र सरकारकडून जाहीर झाले असून, त्यात चार मराठी व्यक्तींचा समावेश आहे. देशाची अव्वल नेमबाज राही सरनोबत आणि राष्ट्रीय फलंदाज स्मृती मानधना या दोघींना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. याचप्रमाणे हिंदकेसरी मल्ल आणि कुस्ती प्रशिक्षक दादू चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार तर हॉकी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते २५ सप्टेंबरला होणाऱ्या सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील या मराठमोळ्या कर्तबगार व्यक्तींच्या कारकिर्दीचा घेतलेला वेध.