देशातील सर्वात मोठी व्यावसायिक लीग म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमाला येत्या रविवारपासून केरळ ब्लास्टर्स आणि अ‍ॅटलेटिको डे कोलकाता यांच्यातील सलामीच्या सामन्याद्वारे सुरुवात होत आहे. १० संघांमध्ये विजेतेपदासाठी थरार रंगणार असून यंदा दिल्ली डायनामोसची जागा ओडिशा एफसीने घेतली आहे. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या पुणे सिटीच्या जागी हैदराबाद एफसीचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या पाच मोसमात अ‍ॅटलेटिको डे कोलकाता, चेन्नईयन एफसी आणि बंगळूरु एफसी या संघांनी ‘आयएसएल’वर अधिराज्य गाजवले आहे.

‘आयएसएल’वर दक्षिणेकडील संघांचेच वर्चस्व पाहायला मिळाले आहे. कोलकाता, चेन्नईयन संघांनी प्रत्येकी दोन वेळा ‘आयएसएल’चे विजेतेपद मिळवले असून दोन वर्षांपूर्वी सामील झालेल्या बंगळूरु एफसीने दोन्ही वेळा अंतिम फेरीत मजल मारून गेल्या वर्षी विजेतेपदालाही गवसणी घातली. दक्षिणेनंतर फुटबॉलची सर्वाधिक आवड असलेल्या केरळ ब्लास्टर्स आणि एफसी गोवा या संघांनी दोन वेळा अंतिम फेरीत मजल मारली असली तरी त्यांना दोन्ही वेळेला विजेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले असून यंदा इंडियन सुपर लीगला नवा विजेता मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बंगळूरु एफसी, अ‍ॅटलेटिको डे कोलकाता, एफसी गोवा आणि केरळ ब्लास्टर्स या चार संघांनी मोठी गुंतवणूक करत यंदाच्या मोसमासाठी आपले चांगले संघ तयार केले आहेत. अंतिम चार जणांमध्ये मजल मारताना अन्य सहा संघांसमोर या चार संघांचा अडथळा नक्कीच असेल. मात्र यंदा दहाही संघ उपांत्य फेरी गाठण्याइतपत सक्षम आहेत. गेल्या वर्षी मुंबई सिटी एफसीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले तरी यंदा चांगली कामगिरी करण्यावर आमचा भर असेल.

– जॉर्ज कोस्टा, मुंबई सिटी एफसीचे प्रशिक्षक.

संकलन : तुषार वैती