भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मुंबईत २० जणांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या पदासाठी आलेल्या अर्जामध्ये माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशी आणि रमेश पोवार यांचे पारडे जड मानले जात आहे. शुक्रवारी या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

भारताचे माजी यष्टीरक्षक अजय रात्रा, विजय यादव, माजी कर्णधार ममता माबेन, सुमन शर्मा हे अन्य क्रिकेटपटूदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. तसेच दोन कसोटी आणि ५१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेली न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटू मारिया फाहेने यांनी सुद्धा या पदासाठी अर्ज केला आहे. ३४ वर्षीय मारिया या गुंटूर येथील आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अकादमीत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

जोशी आणि पोवार हे महिला प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तुषार आरोठे यांनी वादग्रस्त पद्धतीने प्रशिक्षकपद सोडल्यानंतर दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेले पोवार सध्या या संघाचे प्रभारी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

जोशी यांच्याकडे खेळाडू आणि प्रशिक्षकपदाचा चांगला अनुभव आहे. डावखुरे फिरकी गोलंदाज जोशी यांनी १५ कसोटी आणि ६९ एकदिवसीय सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय ओमान आणि बांगलादेशचे प्रशिक्षकपद त्यांनी भूषवले आहे. १६० प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव असलेल्या जोशी यांनी जम्मू काश्मीर, आसाम आणि हैदराबाद राज्यांच्या संघांचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे.

प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी, बीसीसीआय क्रिकेट संचालन विभागाचे महाव्यवस्थापक साबा करीम आणि सचिव अमिताभ चौधरी या मुलाखती घेणार आहेत.

विश्वचषक स्पर्धेनंतर आरोठे आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंमधील मतभेद वाढले होते. त्यामुळे आरोठे यांना प्रशिक्षकपद सोडावे लागल्यानंतर बीसीसीआयकडून या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते.