भारतीय महिला क्रिकेट संघातील गोलंदाजीच्या फळीत आपल्या अनोख्या शैलीमुळे ओळखली जाणारी ऑल राऊंडर पूजा वस्त्रकार सध्या क्रिडा विश्वात चांगलीच चर्चेत आहे. मैदानावरच्या तिच्या खेळीने सध्या अनेकांनाच आश्चर्याचा धक्का दिला असून, विश्वविक्रमाची नोंद तिच्या नावे करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघातून नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या पूजाने ५६ चेंडूंमध्ये ५१ धावा करत संपूर्ण क्रिडा जगताचं लक्ष स्वत:कडे वेधलं आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात नवव्या स्थानावर येऊन फलंदाजी करत अर्धशतक झळकावणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे.

न्यूझीलंडच्या ल्यूसी दूलान हिचा सर्वाधिक ४८ धावांचा विक्रम मोडित काढत तिने हा विक्रम केला. ल्यूसीने २००९ मध्ये इंग्लंडविरोधात खेळण्यात आलेल्या सामन्यात नवव्या स्थानावर येऊन फलंदाजी करत सर्वाधिक ४८ धावा केल्या होत्या. या यादीत भारतीय महिला क्रिकेट संघातील आणखी एका खेळाडूचं नाव आहे. तिसऱ्या स्थानावर असणारी ती खेळाडू म्हणजे झुलन गोस्वामी. २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात झुलनने ४३ धावा केल्या होत्या.

नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या पूजाने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन महिला संघातील गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यात भारतीय महिलांचं संघ अगदी कमी धावसंख्येवर बाद होण्याची भीती होती. पण, सुषमा वर्मा आणि पुजा वस्त्राकर यांच्यात आठव्या विकेटसाठी झालेल्या ७६ धावांच्या भागिदारीमुळे भारताने सन्मानजनक धावसंख्येचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारती महिला क्रिकेट संघाच्या वाट्याला अपयश आलं असलं तरीही सोशल मीडियावर पूजाच्या खेळीने मात्र क्रीडारसिकांची मनं जिंकली हेच खरं.

नवव्या स्थानावर येत फलंदाजी करणाऱ्या पहिल्या दहा महिला क्रिकेट खेळाडू खालील प्रमाणे-
-पूजा वस्त्रकार (भारत) वि. ऑस्ट्रेलिया- ५१ धावा
-ल्यूसी दूलान (न्यूझीलंड) वि. इंग्लंड- ४८ धावा
-झुलन गोस्वामी (भारत) वि. दक्षिण आफ्रिका- ४३* धावा
-वाय वान डेर मर्वे (दक्षिण आफ्रिका) वि. भारत- ४२* धावा
-रेने फॅरेल (ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंड- ३९* धावा
-शॅनेल डेली (वेस्ट इंडिज) वि. दक्षिण आफ्रिका- ३८* धावा
-पी. थॉमस (वेस्ट इंडिज) वि. भारत- ३८ धावा
-डी. स्मॉल (वेस्ट इंडिज) वि. श्रीलंका- ३७* धावा
-रॅचेल प्रिस्ट (न्यूझीलंड) वि. आयर्लंड- ३६ धावा
-लॉरा मार्श (इंग्लंड) वि. श्रीलंका- ३६* धावा

वाचा : …म्हणून सोनाली बेंद्रेला गावसकरांची मागावी लागली माफी?