टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर पडल्याने काही खेळाडूंच्या कारकीर्दीवर परिणाम होऊ शकतो. यास्थितीत भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि क्रीडा मंत्रालय नव्याने नियोजन करणार आहेत.

‘‘एका वर्षांने ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्याने काही खेळाडूंच्या कारकीर्दीवर किंवा त्यांच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो. त्या सर्वाचा आढावा पुढील काही महिन्यांत घेण्यात येईल आणि त्यादृष्टीने सहकार्य देण्यात येईल,’’ असे ‘आयओए’चे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले. मेहता यांनी त्या खेळाडूंची नावे मात्र जाहीर केली नाहीत. ‘‘विविध क्रीडा महासंघांबरोबर देशातील टाळेबंदी संपल्यावर आपण बैठक घेऊ. सध्याच्या काळात खेळाडूंच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य आहे. केंद्रीय युवा क्रीडा मंत्रालयाशीदेखील संबंधित खेळाडूंबाबत चर्चा करू,’’ असे मेहता यांनी स्पष्ट केले. अनेक खेळांच्या पात्रता स्पर्धा करोनामुळे रद्द झाल्याने अनेक खेळाडू अजूनही ऑलिम्पिकला पात्र ठरण्याविषयी अनभिज्ञ आहेत

क्रीडामंत्र्यांकडून ‘आयओसी’च्या निर्णयाचे स्वागत

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर  टाकण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘‘जगभरातील खेळाडूंच्या हिताच्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतलेला  निर्णय योग्य आहे,’’ असे रिजीजू यांनी सांगितले. भारताचे जे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरले आहेत त्यांना सरकारकडून त्यांच्या तयारीसाठी पूर्णपणे सहकार्य देण्यात येईल, असेही रिजीजू यांनी स्पष्ट केले. ‘‘खेळाडूंनी सध्याच्या कठीण काळात हार मानू नये. सरावासाठी आता अधिक वेळ मिळाला आहे असे समजावे आणि खेळाडूंनी तयारी करावी. जेणेकरुन २०२१मध्ये पदकतालिकेत पदकांचा आकडा देशाला वाढवता येईल,’’ असे रिजीजू यांनी म्हटले.