ट्वेन्टी-२० हे साडेतीन तासांचे क्रिकेट जनसामान्यांवर गारुड करीत असताना कसोटी क्रिकेट टिकणे कठीण जाईल, ही काही वर्षांपूर्वी जाणकारांनी व्यक्त केलेली भीती फोल ठरत आहे. पाच दिवसांचे नीरस आणि कंटाळवाणे सामने आता इतिहासजमा झाले आहेत. अगदी अखेरच्या षटकांपर्यंत कसोटी क्रिकेटची रंगत टिकू शकते, हे चालू वर्षांने सप्रमाण स्पष्ट केले आहे. २०१३ मध्ये झालेल्या ४३ कसोटी सामन्यांत ३३ सामने निकाली ठरले तर फक्त १० अनिर्णीत राहिले. या आकडेवारीवरूनच कसोटीची लोकप्रियता अजूनही शिल्लक आहे, हे स्पष्ट होते. जोहान्सबर्गला झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीमधील रंगत सर्वानीच अनुभवली, याचप्रमाणे मेलबर्नला सुरू असलेल्या अ‍ॅशेस सामन्याला क्रिकेटचाहत्यांनी विक्रमी उपस्थिती राखली होती. हे वर्ष जसे कसोटी क्रिकेट जिवंत ठेवणाऱ्या सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचे होते, तसेच भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या वर्चस्वाचे होते. याचप्रमाणे अ‍ॅशेसमधील ठस्सन आणि जया-पराजयाचे विविध कंगोरे रंजक होते, तसेच अनेक वाईट आणि वादग्रस्त घटनांनीही हे वर्ष संस्मरणीय ठरले.

क्रिकेटच्या सम्राटाला निरोप
सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटच्या दुनियेतील सच्चा सम्राट. गेली २४ वष्रे क्रिकेटरसिकांच्या सुख-दु:खांशी आपल्या मनमोहक खेळींमुळे भावनिकदृष्टय़ा जोडल्या गेलेल्या सचिनच्या निवृत्तीमुळे साऱ्यांचेच मन हेलावले. वानखेडे स्टेडियमवर सचिनने केलेले हृदयस्पर्शी भाषण ऐकताना सर्वानाच हुंदके आवरणे कठीण गेले. सचिननेसुद्धा पाणावलेल्या डोळ्यांनी साऱ्यांचा यथोचित निरोप घेतला. मैदानावरून ड्रेसिंगरूमकडे जाताना मैदानाला वाकून नमस्कार करणाऱ्या सचिनच्या निरोपाची भावनिकता देशभरात जाणवत होती. २००व्या कसोटी सामन्याने अलविदा करणाऱ्या सचिनच्या खात्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील १०० आंतरराष्ट्रीय शतके आणि ५० हजारांहून अधिक धावा जमा होत्या.
कसोटी क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसची निवृत्ती ही यादगार ठरली, ती त्याच्या शानदार शतकी खेळीमुळे. या निरोपाच्या कसोटीत कॅलिसने सर्वाधिक धावांच्या पंक्तीमधील राहुल द्रविडला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर मुसंडी मारली. ‘मिस्टर क्रिकेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकेल हसीने वर्षांरंभी निवृत्ती पत्करली, तर वर्षांच्या उत्तरार्धात ग्रॅमी स्वानने अ‍ॅशेस चालू असताना अचानक निवृत्तीची धक्कादायक घोषणा केली. श्रीलंकेच्या संघाचा आधारस्तंभ तिलकरत्ने दिलशाननेही क्रिकेटजगताला अलविदा केला. याशिवाय अजित आगरकर, ख्रिस मार्टिन यांनीही क्रिकेटला रामराम ठोकला.  
 फिरकीच्या तालावर भारताची मर्दुमकी
भारतीय भूमीवर फिरकीच्या बळावर भारताने आपले निर्विवाद वर्चस्व राखले. वर्षांरंभी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये ४-० अशी मर्दुमकी गाजवली. तर उत्तरार्धात वेस्ट इंडिजला २-० असे सहजगत्या हरवले. सचिनच्या निवृत्तीला भारतीय भूमीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भारताने दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाशी पंगा घेतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा दौरा छोटा झाला आणि वेस्ट इंडिजचा छोटेखानी दौरा कार्यक्रमात अचानक सामील झाला. हारून लॉरगेटमुळे हा वाद चिघळला असल्याचे जरी चर्चेत असले तरी प्रत्यक्षात मात्र सचिनच्या ऐतिहासिक सामन्याचे प्रक्षेपण आपले हितसंबंध जपणाऱ्या वाहिनीवरून व्हावे, यासाठीचे हे बीसीसीआयचे षड्यंत्र होते, असेही म्हटले जात आहे. अखेर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत गेला. पण अनपेक्षितपणे भारतीय संघाने आफ्रिकेतील वेगवान खेळपट्टय़ांवरही आपल्या दर्जाला साजेसा खेळ केला. झहीर खान, इशांत शर्मा यांचा अनुभव पणाला लागला. विराट कोहलीने सचिनच्या चौथ्या स्थानावर तर चेतेश्वर पुजाराने राहुल द्रविडच्या तिसऱ्या स्थानावर आपली छाप पाडली. मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध धवनने पदार्पणात वेगवान शतक झळकावण्याची किमया साधताना १८७ धावांची वादळी खेळी साकारली. तर पदार्पणवीर रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यांत शतके झळकावून आपले कसोटी क्रिकेटमधील स्थान पक्के केले. उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० असा विजय मिळवला. आर. अश्विनच्या अष्टपैलू खेळाचा भारताचे कसोटी क्रिकेट क्रमवारीतील दुसरे स्थान राखण्यात सिंहाचा वाटा आहे.
 दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी
दक्षिण आफ्रिकेने २०१३ मध्ये ९ सामन्यांत ७ विजय संपादन करीत आपले कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले. ग्रॅमी स्मिथचे नेतृत्व आणि डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल, व्हर्नन फिलँडर यांच्यासारख्या ‘तेज’स्वी माऱ्याच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला हे यश मिळाले. वर्षांच्या आरंभी दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध २-० तर पाकिस्तानविरुद्ध ३-० असे प्रभुत्व राखले. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती येथे पाकिस्तानविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. तर उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेने भारताला १-० असे हरवले.
 
अ‍ॅशेसची ‘ठस्सन’
एकीकडे मैदान म्हणजे मंदिर मानणारा सचिन क्रिकेटने पाहिला तर, दुसरीकडे क्रिकेटच्या जन्मदात्यांनी विजयाच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाच्या भरात खेळाला काळिमा फासला. सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ पार पाडला आणि प्रेक्षागृह रिकामे झाल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंची द ओव्हलच्या मैदानावरच ओली पार्टी रंगली. काळोखाच्या सान्निध्यात, चांदण्यांच्या प्रकाशात ओव्हलच्या हिरवळीवर इंग्लिश खेळाडू आपल्या परंपरागत प्रतिस्पध्र्याना नामोहरम केल्याचा आनंद मद्यासोबत साजरा करीत असल्याचे छायाचित्र मॅट प्रायरने ‘ट्विटर’वर टाकले. पण त्यासोबत ‘अ‍ॅशेसमधील सर्वोत्तम क्षण’ असे नमूद करायला तो विसरला नाही. अ‍ॅशेस जिंकल्याच्या आनंदात मदहोश झालेल्या इंग्लिश खेळाडूंच्या नसानसांत मद्याची ही नशा इतकी भिनली की, ते तारतम्य हरपून बसले. त्यानंतर केव्हिन पीटरसन, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यासाठी ओव्हलचे मैदानच जणू शौचालय झाले. याचे साक्षीदार असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांनी हा क्षण मग अधिक रंगवला. इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांची ही मालिका ३-० अशी जिंकली. इयान बेल आणि रयान हॅरिसने मालिकावीर पुरस्कार पटकावला. वर्षांच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाने त्या पराभवाचे उट्टे फेडले आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपले ४-० असे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मिचेल जॉन्सनच्या वेगवान माऱ्याचा धसका इंग्लिश फलंदाजांनी घेतल्याचे अधोरेखित झाले आहे.
 
वादात ऑस्ट्रेलिया-इंग्लंडची आघाडी
भारत दौऱ्यावरील तिसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने शेन वॉटसन, जेम्स पॅटिन्सन, मिचेल जॉन्सन आणि उस्मान ख्वाजा यांची शिस्तीचे पालन न केल्याप्रकरणी हकालपट्टी केली. त्यामुळे संतापलेल्या वॉटसनने थेट ऑस्ट्रेलिया गाठून आपल्या निवृत्तीची तयारी सुरू केली. माजी क्रिकेटपटूंनीही शिस्तीच्या या बडग्यावर तीव्रपणे टीका केली. त्यानंतर हे प्रकरण ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने अतिशय सावधपणे सोडवले. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने इंग्लिश क्रिकेटपटू जो रूटला एका बारमध्ये ठोसा लगावून वाद निर्माण केला. याचप्रमाणे इंग्लिश फिरकी गोलंदाज मॉन्टी पनेसारनेही मद्यपान करून चर्चेत राहण्याचे कार्य केले. त्यामुळे वादंगात राहण्यात ऑस्ट्रेलिया-इंग्लंडने आघाडी राखली.