IPL 2019 RCB vs CSK : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात यजमान बंगळुरूने चेन्नईला एका धावेने पराभूत केले. शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या २६ धावांचा पाठलाग करताना धोनीने ५ चेंडूत २४ धावा फटकावल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ८४ धावा केल्या. पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. अखेरच्या चेंडूवर यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने शार्दूल ठाकूरला चपळाईने बाद करून सामना बंगळुरूच्या नावे केला.

या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने ७ उत्तुंग षटकार लगावले. उमेश यादवच्या शेवटच्या षटकात तर धोनीने त्याचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ५ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकार खेचत तब्बल २४ धावा ठोकल्या. याच षटकारांमधील १ षटकार हा यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा आणि लांब षटकार ठरला. धोनीने खेचलेला षटकार स्टेडियमच्या वरून थेट बाहेर रस्त्यावर गेला. त्याचा हा षटकार १११ मीटर लांब होता.

या आधी हार्दिक पांड्याने याच मैदानावर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर १०४ मीटर लांब षटकार मारला होता. तो षटकार आतापर्यंतचा या हंगामातील मोठा व लांब षटकार होता, पण रविवारी धोनीने मारलेला षटकार हा सर्वात मोठा षटकार ठरला.

दरम्यान, १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली.आधी वॉटसन ५ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर स्टेनने रैनाचा (०) त्रिफळा उडवला. सलामीवीर फाफ डु प्लेसिस मोठा फटका खेळण्यासाठी सरसावला, पण तो फटका चुकला आणि डु प्लेसिस ५ धावांवर माघारी परतला. डु प्लेसिस सारखाच फटका खेळून केदार जाधवही तंबूत परतला आणि चेन्नईला २८ या धावसंख्येवर चौथा धक्का बसला. केदारने ९ धावा केल्या.

चार गडी झटपट बाद झाल्यानंतर अंबाती रायडूने धोनीच्या साथीने डाव सावरला, पण विजयासाठी आवश्यक असलेली धावगती गाठण्यासाठी त्याने फटकेबाजीचा पर्याय स्वीकारला. त्यातच २ चौकार आणि १ षटकार लगावून तो २९ धावांवर माघारी परतला. या दोघांनी मिळून ५५ धावांची भागीदारी केली. धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात भागीदारी होत असतानाच जाडेजा धावचीत झाला आणि चेन्नईला सहावा धक्का बसला. जाडेजाने ११ धावा केल्या. एकीकडे फलंदाज बाद होताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक बाजू लावून धरली. ३५ चेंडूत त्याने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. निर्णायक क्षणी ब्राव्हो झेलबाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या.

त्याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या फलंदाजांनी निराशा केली. मात्र पार्थिव पटेल आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी संयम राखत फटकेबाजी करुन संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला झटपट माघारी धाडण्यात चेन्नईचे गोलंदाज यशस्वी ठरले. दिपक चहरने कोहलीला माघारी धाडलं. यानंतर एबी डिव्हीलियर्स, अक्षदीप नाथ, स्टॉयनिस यांनी थोड्या-थोड्या कालावधीसाठी पार्थिव पटेलला चांगली साथ दिली. मात्र मोठी खेळी करण्यात ते अपयशी ठरले.

पार्थिव पटेलने मात्र एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने ३७ चेंडूत ५३ धावा केल्या. ब्राव्होच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. पार्थिव बाद झाल्यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला १६१ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून दिपक चहर-शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. इम्रान ताहीरने एका फलंदाजाला बाद केलं.