‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात सट्टेबाजांशी संबंध असल्याचा आरोप असलेले पंच असद रौफ यांनी मुंबई पोलिसांच्या चौकशीची चाहूल लागताच पाकिस्तानात पलायन केले होते. परंतु बुधवारी रौफ यांनी आपले मौन सोडले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाच्या चौकशीला मी आनंदाने सामोरे जाईन, असे स्पष्टीकरण केले आहे.‘‘पैसा, भेटवस्तू, स्पॉट-फिक्सिंग आणि मॅच-फिक्सिंग हे कधीच माझे ध्येय नव्हते. या साऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यात अग्रस्थानी कधीच नव्हत्या आणि त्यांचा मी कधीच विचार केला नाही,’’ असे रौफ यांनी यावेळी सांगितले.आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, ‘‘जर आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाने माझी चौकशी करायचे ठरवले तर त्यांनी मी पूर्णपणे सहकार्य करेन आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन.’’स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात रौफ यांचे नाव आल्यावर आयसीसीने त्यांचे नाव इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठीच्या पंचांच्या समितीमधून वगळले होते. याबद्दल आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले होते की, ‘‘रौफ यांची चौकशी मुंबई पोलीस करीत असल्यामुळे आम्ही त्यांचे नाव चॅम्पियन्स करंडकातून वगळत आहोत.’’रौफ हे आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात समोर आलेले पहिले पंच आहेत. रौफ यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहिली तर वादविवादांचा त्यांचा इतिहास फारच मोठा आहे. गेल्या वर्षी मॉडेल लीना कपूर हिने रौफ यांच्यावर शारीरिक छळाचा आरोप केला होता. रौफ यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवत मला लग्नाचे वचन दिले होते, पण आता रौफ माझ्याशी लग्न करण्यास तयार नसल्याचे लीनाने सांगितले होते. स्पॉट-फिक्सिंगमधील रौफ प्रकरणापासून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) लांब राहणेच पसंत केले आहे. पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ याबाबत म्हणाले की, ‘‘ही स्पर्धा भारतात झाली होती आणि रौफ हे आयसीसीचे मान्यताप्राप्त पंच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आयसीसीला आहे.’’