Rishabh Pant Confusion on DRS with Umpire : आयपीएल २०२४ मधील २६ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात लखनऊची सुरुवात खराब झाली आणि पॉवर प्लेमध्येच संघाने आपल्या दोन फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. याशिवाय डीआरएसबाबत सामन्यात पुन्हा एकदा गदारोळ झाला. याबाबत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत बराच वेळ मैदानावरील पंचांशी वाद घालताना दिसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डीआरएसवरून गदारोळ का झाला?

वास्तविक, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दिल्लीसाठी डावातील चौथे षटक टाकत होता. देवदत्त पडिक्कल त्याच्यासमोर फलंदाजी करत असताना इशांतचा एक चेंडू देवदत्तच्या लेग पॅडजवळून गेला, त्याला अंपायरने वाईड घोषित केले. त्यानंतर दिल्लीच्या बाजूने या चेंडूवर डीआरएस घेण्यात आला की हा चेंडू वाईड नाही आणि मैदानी पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवला. पण यानंतर पंत बराच वेळ मैदानी पंचांशी वाद घालताना दिसला.

पंतचे म्हणणे होते की त्यांनी डीआरएस घेण्याबाबत कोणताही इशारा केला नाही. त्यामुळे तुम्ही डीआरएस थर्ड अंपायरकडे का जात आहात. यावर पंच म्हणताना दिसले की तू डीआरएस घेण्याचा इशारा केला होता. यानंतर जेव्हा रिप्लेमध्ये पाहण्यात आला, तेव्हा पंतने डीआरएससाठी इशारा केल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे दिल्लीला हा डीआरएसही गमवावा लागला. कारण चेंडू वाईडच होता.

हेही वाचा – LSG vs DC : दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा कोण आहे जेक फ्रेझर मॅकगर्क? ज्याने २९ चेंडूत झळकावलय शतक

आयुष बडोनीने सांभाळली लखनऊची धुरा –

लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य दिले. लखनऊची सुरुवात खराब झाली. मात्र आयुष बडोनीने डावाची धुरा सांभाळली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. बडोनीने ३५ चेंडूंचा सामना करत ५५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. अर्शद खान २० धावा करून नाबाद राहिला. कर्णधार केएल राहुलने २२ चेंडूत ३९ धावा केल्या. डी कॉकने १९ धावांची खेळी खेळली. स्टॉइनिस ८ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे लखनौने २० षटकांत ७ गडी गमावून १६७ धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २० धावा देत ३ बळी घेतले. खलील अहमदने २ बळी घेतले. मुकेश कुमार आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक बळी घेतला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dc vs lsg match updates rishabh pant took drs by mistake for wide ball in ipl 2024 vbm