Fraser McGurk Debut from Delhi Capitals in IPL 2024: आयपीएल २०२४ मधील २६ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. या मोसमात आतापर्यंत दिल्लीची कामगिरी काही विशेष झाली नाही. दिल्लीला ५ पैकी ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता दिल्लीचा संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करत आहे. लखनऊविरुद्धच्या या सामन्यात स्टार खेळाडू जेक फ्रेझर-मॅकगर्कने दिल्ली संघात पदार्पण केले आहे. आता या खेळाडूकडून दिल्लीच्या चाहत्यांना आणि संघाला उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.

कोण आहे जेक फ्रेझर मॅकगर्क?

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २१ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू जेक फ्रेझर-मॅकगर्कचा त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्कचा हा पदार्पण सामना आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्कने लिस्ट ए क्रिकेटमध्ये चांगलीच चमक दाखवली आहे. सर्वात कमी चेंडूंवर शतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्क यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये अवघ्या २९ चेंडूत शतक झळकावले होते.

सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक झळकावून जेक फ्रेझर-मॅकगर्कने दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सचे विक्रमही मोडीत काढले होते. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये अवघ्या ३० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले होते. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता, ज्याने अवघ्या ३१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. जेक फ्रेझर-मॅकगर्कने दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना तस्मानियाविरुद्ध ही कामगिरी केली होती. या सामन्यात जेक फ्रेजर-मॅकगर्कने ३८ चेंडूत १२५ धावांची खेळी केली होती.

हेही वाचा – रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

जेक फ्रेझर-मॅकगर्कची कारकीर्द –

आतापर्यंत जेक फ्रेझर-मॅकगर्कला ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही, परंतु त्यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये अनेक अप्रतिम खेळी खेळल्या आहेत. जेक फ्रेझर-मॅकगर्कने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यात त्याच्या नावावर ३०९ धावा आहेत. ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय जेक फ्रेजर-मॅकगर्कच्या नावावर लिस्ट ए क्रिकेटमधील १६ सामन्यांमध्ये ४३७ धावा आहेत. या काळात त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

हेही वाचा – MI vs RCB : विराट कोहलीने अचानक मैदानात आपले दोन्ही कान का पकडले? VIDEO होतोय व्हायरल

दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.