Jos Buttler Big statement on Virat Dhoni : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३१वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २ विकेट्सनी पराभव केला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर २२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने जोस बटलरच्या नाबाद १०७ धावांच्या खेळीच्या जोरावर शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर जोस बटलरने आपल्या या मॅच विनिंगबद्दल एक मोठं गुपित उघड केलं.

कोलकाता नाईट रायडर्सच्या २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघ १३ व्या षटकात १२२ धावांवर ६ विकेट्स गमावूनअडचणीत सापडला होता, मात्र जोस बटलरने ६० चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर नाबाद १०७ धावा करुन संघाला विजय मिळवून दिला तत्पूर्वी, सुनील नरेनने शानदार फलंदाजी करत ५६ चेंडूत ६ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या होत्या. त्यामुळे केकेआरने ६ बाद २२३ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, बटलरच्या नाबाद शतकापुढे नरेनची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

‘स्वत:वरचा विश्वास कायम ठेवणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली’ –

सामन्यानंतर जोस बटलर म्हणाला, “स्वत:वरचा विश्वास कायम ठेवणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. मी सूर गवसण्यासाठी थोडा संघर्ष करत होतो. अशा वेळी कधी-कधी तुम्हाला निराश वाटते. त्यावेळी तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी स्वतःला सांगतो की ठीक आहे, पुढे जात रहा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करं. असं केल्याने तुम्हाला तुमची लय परत मिळते.”

हेही वाचा – IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरला १२ लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण?

बटलर धोनी-विराटबद्दल काय म्हणाला?

धोनी-विराटबद्दल बोलताना जोस बटलर म्हणाला, “आयपीएलमध्ये तुम्ही अनेक वेळा विचित्र गोष्टी घडताना पाहिल्या आहेत. धोनी आणि कोहलीसारखे खेळाडू ज्या प्रकारे शेवटपर्यंत टिकून राहतात आणि स्वतःवर विश्वास ठेवतात, मीही तेच करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनाही आयपीएलमध्ये अनेकवेळा स्वत:वर विश्वास ठेवून सामना जिंकताना तुम्ही पाहिले असेल. मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे.”

कोलकाताच्या पराभवावर श्रेयस अय्यर काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर पराभवाबद्दल बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “काय झाले हे सांगणे कठीण आहे, आम्हाला त्याचा सामना करून पुढे जायचे आहे. हे स्पर्धेच्या शेवटी नव्हे, तर येथे घडले याचा आनंद आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या चुकांमधून शिकतो आणि पुन्हा मजबूत होतो.”

हेही वाचा – IPL 2024 : गुणतालिकेत नीचांकी, तिकीटं उच्चांकी; आरसीबीच्या मॅचच्या तिकिटाला मात्र ५० हजारांचा भाव

कोलकाता नाईट रायडर्सने अखेरच्या षटकात नऊ धावांचा बचाव करण्याची जबाबदारी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीवर सोपवली, मात्र तो त्यात अपयशी ठरला. शेवटचे षटक चक्रवर्तीला देण्याच्या निर्णयाचा बचाव करताना अय्यर म्हणाला, “बटलर सहज फटके मारत होता म्हणून मला वाटले की चेंडूचा वेग कमी करु आणि यासा वरुण चक्रवर्तीकडे षटक सोपवले. मात्र, बटलरने यशस्वीपणे मोठा शॉट खेळला.”