आयपीएल २०२४ च्या ३३व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे संघ आमनेसामने आहेत. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. हा सामना सुरु होताच मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. एमएस धोनीनंतर ही कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू बनवला आहे.

पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला जाणारा सामना हा रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील २५०वा सामना आहे. रोहित शर्माशिवाय एमएस धोनी हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू आहे ज्याने आयपीएलमध्ये २५० सामने खेळले आहेत. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २५६ सामने खेळले आहेत. रोहित शर्मा हा आयपीएलधील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने ६ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. २००८ पासूनच रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळत आहे, आयपीएलचे सर्व सामने खेळणारा खेळाडूंच्या यादीत रोहितचाही समावेश आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
एमएस धोनी – २५६ सामने
रोहित शर्मा – २५० सामने
दिनेश कार्तिक – २४९ सामने
विराट कोहली – २४४ सामने
रवींद्र जडेजा – २३२ सामने

पंजाबविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. सलामीसाठी आलेल्या रोहित शर्माने २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३०.१० च्या सरासरीने ६४७२ धावा केल्या आहेत. यारदरम्यान त्याने १३१.२२ च्या स्ट्राइक रेटने ४२ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, रोहित शर्माने आयपीएलच्या या हंगामातील ६ सामन्यात ५२.२० च्या सरासरीने २६१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.