आयपीएल ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने भारतीय क्रिकेट जगताला हादरविल्यानंतर शुक्रवारी आणखी नवी माहिती उजेडात येत आहे. आयपीएलमधील तीन सामन्यांमध्ये स्पॉट-फिक्सिंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु अटक करण्यात आलेल्या तीन खेळाडूंनी आणखी काही सामन्यांत स्पॉट-फिक्सिंग केली आहे का, याचा दिल्ली पोलीस सध्या कसून शोध घेत आहे. आणखी काही खेळाडूंची नावे पुढे येण्याची शक्यतासुद्धा वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सच्या मालकीण शिल्पा शेट्टी, कप्तान राहुल द्रविड यांनासुद्धा या चौकशीत साक्षीदार म्हणून हजर राहावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५, ९ आणि १५ मे रोजी झालेल्या सामन्यांमध्ये स्पॉट-फिक्सिंग झाल्याचे वस्तुनिष्ठ पुरावे सापडले आहेत. यासंदर्भात एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्याशिवाय ११ सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अन्य काही सामन्यांमध्ये स्पॉट-फिक्सिंग झाल्याचा संशय दूरध्वनी संभाषणांच्या पुराव्यांमुळे बळावला आहे. पण सध्याच्या तपासानुसार आपण ते सबळपणे सिद्ध करू शकत नाही.
मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री श्रीशांतसह अन्य दोन क्रिकेटपटूंना अटक केली. पोलिसांनी भारतीय दंड विधेयकाच्या कलम ४२० आणि १२०-ब अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर निलंबानाची कारवाई केली. विशिष्ट षटकात विशिष्ट धावा देण्यासाठी या सट्टेबाजांनी या खेळाडूंना ६० लाख रुपये दिल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या अटक करण्यात आलेले क्रिकेटपटू आणि सट्टेबाजांना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख रवी सवानी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणी ३० दिवसांत चौकशी अहवाल करण्याचे आदेश दिले आहेत.

मी दिल्ली पोलिसांचे अभिनंदन करतो. जेव्हा ते चांगले काम करतात, तेव्हा मी त्यांचे कौतुक करतो. चौकशी प्राथमिक अवस्थेत आहे. पोलीस लवकरच हे प्रकरण पूर्ण प्रकाशात आणतील.
– सुशीलकुमार शिंदे,
केंद्रीय गृहमंत्री

‘स्पॉट-फिक्सिंग’मध्ये नाव असल्याच्या चर्चेने भांबावून गेलो होतो – टेट
पीटीआय, सिडनी
‘‘माझे नाव ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात असल्याची चर्चा काही सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर सुरू असल्याने मी भांबावून गेलो होतो, रागावलो होतो आणि निराशही झालो होतो. पण दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही परदेशी खेळाडूचा हात नसल्याचे जाहीर केल्यानंतर मला दिलासा मिळाला आहे. कोणतेही सत्य जाणून न घेता माझे नाव गोवण्यात आले होते. माझ्या कारकीर्दीत मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही,’’ असे राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज शॉन टेटने सांगितले.

चेन्नई पोलिसांचे धाडसत्र; सहा जणांना अटक
चेन्नई : राजस्थान रॉयल्सच्या तीन क्रिकेटपटूंना स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तामिळनाडू पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजीसंदर्भातील एक रॅकेट उजेडात आणले. पोलिसांनी या धाडसत्रामध्ये सहा सट्टेबाजांना अटक असून, त्यांच्याकडे १४ लाख रुपये सापडले आहेत.
तामिळनाडू पोलिसांनी शहरातील १३ ठिकाणी छापे घातले. या धाडसत्रामध्ये शुक्रवारी सहा सट्टेबाजांना ताब्यात धेण्यात आले. आयपीएल सट्टेबाजीचा संशयित मास्टरमाइंड हा दिल्लीहून हे रॅकेट चालवतो, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक पेरूमल आणि एस. राजेश्वरी यांनी
सांगितले.
सट्टेबाजीसंदर्भात गुरुवारी महत्त्वाचे धागेदोरे दिल्ली पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी १३ विशेष पथके स्थापन करून या धाडी घातल्या.