स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट हादरल्यानंतर राजीनामा देणारे सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनी पदावर परतण्याची विनंती झिडकारली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आता नवे हंगामी सचिव आणि कोषाध्यक्ष नेमावे लागणार आहेत.
‘‘आपण बीसीसीआयच्या कार्यकारिणीमध्ये पुन्हा परतणार नसल्याचे त्यांनी (जगदाळे आणि शिर्के) कळवले आहे,’’ असे बीसीसीआयचे संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी सोमवारी सांगितले.
जगदाळे आणि शिर्के यांनी आपल्या पदावर परतण्याचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे जगमोहन दालमिया यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीला धक्का बसला आहे. सध्या ठाकूर हे कार्यकारी सचिव म्हणून काम पाहात आहेत.

‘‘विशेष सर्वसाधारण सभा होईपर्यंत मी बीसीसीआयच्या सचिवपदाचे काम पाहणार आहे. नवे सचिव आणि कोषाध्यक्ष नेमण्यासाठी किंवा निवडण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा होण्याची आवश्यकता आहे,’’ असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंदरजितसिंग बिंद्रा यांनी रविवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीविषयी ‘मॅच-फिक्सिंगपेक्षा हे वाईट होते’ असे वक्तव्य केले होते. याविषयी ठाकूर म्हणाले की, ‘‘मी या विषयी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.’’
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी तीन खेळाडूंना अटक आणि जावई गुरुनाथ मयप्पनला अटक झाल्यानंतर नैतिकतेच्या मुद्दय़ावरून एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. याच पाश्र्वभूमीवर शुक्रवारी कोषाध्यक्ष शिर्के आणि सचिव जगदाळे यांनी राजीनामे दिले होते.
रविवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या तातडीच्या बैठकीमध्ये श्रीनिवासन यांनी या दोघांचेही राजीनामे फेटाळून आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला होता. पण ते दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले.