गचीबोली स्टेडियमवरील हैदराबादच्या टप्प्यातील अखेरचा दिवस हा प्रो कबड्डी लीगमध्ये कलाटणी देणारा ठरला. आठपैकी आठ लढती जिंकून अपराजित राहणाऱ्या यू मुंबाचा विजयरथ गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सने रोखण्याची किमया साधली, तर यजमान तेलुगू टायटन्सने पुणेरी पलटणला बरोबरीत रोखून प्रो कबड्डीच्या गुणतालिकेत आघाडीचे स्थान काबीज केले.
उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालेल्या यू मुंबाने शुक्रवारी जीवा कुमार आणि शब्बीर बापू या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जयपूर पिंक पँथर्सने प्रारंभीपासून कडवी झुंज देत पहिल्या सत्रात १५-११ अशी आघाडी घेतली. मग दुसऱ्या सत्रात २३व्या मिनिटाला जयपूरने यु मुंबावर लोण चढवला. त्यानंतर मात्र यू मुंबाला सामन्यात परतणे कठीण गेले. या सामन्यात यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारच्या दोनदा व रिशांक देवाडिगाची एकदा ‘सुपर कॅच’ झाली, हे गुण अखेरीस जयपूरच्या पथ्यावर पडले. त्यामुळे त्यांना ३५-२५ अशा फरकाने हा सामना खिशात घालता आला. जयपूरकडून सोनू नरवालने चढायांचे ६ तर कुलदीप सिंगने पकडींचे ६ गुण मिळवले.
दुसऱ्या लढतीत पुणेरी पलटणने अनपेक्षितरीत्या तेलुगू टायटन्सला तोलामोलाची लढत देऊन हैदराबादमध्ये दुसरा बरोबरीचा निकाल नोंदवला. पुण्याने ८व्या मिनिटालाच लोण चढवून आपले मनसुबे प्रकट केले. त्यानंतर १७व्या मिनिटाला तेलुगू टायटन्सने लोण परतवून  दर्जाला साजेसा खेळ केला. दुसऱ्या सत्रात सुकेश हेगडे आणि वझीर सिंग यांच्यातील चढायांची जुगलबंदी पाहायला मिळाली. पण दीपक हुडाची अखेरची चढाई निष्फळ झाली आणि हा सामना २९-२९ असा बरोबरी सुटला. पुण्याच्या वझीरने चढायांचे ११ आणि पकडीचा एक गुण मिळवत विजयात मोलाची भूमिका बजावली. प्रवीण नेवाळेने त्याला छान साथ दिली. तेलुगू टायटन्सकडून चढायांमध्ये सुकेशने ८ आणि दीपकने ७ गुणांची कमाई केली.

आजचे सामने
दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरियर्स
पाटणा पायरेट्स वि. बंगळुरू बुल्स
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी’