इंडियन बॅडमिंटन लीग आणि लिलाव याबाबतीत आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. इंडोनेशियाच्या तौफिक हिदायतने लिलावाबाबत केलेल्या वक्तव्याचा सायना नेहवालने समाचार घेतला होता. मात्र तौफिकसारख्या महान खेळाडूवर सायनाने केलेला शाब्दिक हल्लाबोल ज्वाला गट्टाला खटकला. त्यामुळे बेधडक ज्वालाने ट्विटरच्या माध्यमातून सायनावर टीकास्त्र सोडले आहे. तौफिकच्या मुद्यावरून भारताच्या या अव्वल बॅडमिंटनपटूंमध्ये आता वादाची ठिणगी पेटली आहे.
‘‘तौफिक हिदायत हा महान खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती स्वीकारली आहे म्हणून त्याने व्यक्त केलेले विचार तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही खेळामध्ये कितीही मोठे झालात तरी तुम्ही अन्य खेळाडूंचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांच्या विचारांचा सन्मान करणेही आवश्यक आहे,’’ असे सांगत ज्वालाने थेट नाव न घेता सायनावर तोंडसुख घेतले आहे.
१५,००० अमेरिकन डॉलरच्या पायाभूत किंमतीवरच खरेदी करण्यात आलेल्या तौफिकने लिलाव पद्धत आणि विदेशी खेळाडूंना देण्यात आलेली वागणूक याविषयी नाराजी व्यक्त केली होती. तौफिकच्या टीकेचा समाचार घेत हैदराबाद हॉटशॉट्स संघातील सहकारी सायना नेहवालने टीकास्त्र सोडले होते. ‘‘आपण निवृत्ती घेतली आहे, हे तौफिकने लक्षात घ्यायला हवे. लिलावात काहीच चुकीचे घडलेले नाही. ली चोंग वुईला सर्वाधिक किंमत मिळाली. इंडियन बॅडमिंटन लीग भारतीय खेळाडूंसाठी आहे, त्यांना चांगली किंमत मिळाल्यास वावगे काहीच नाही,’’ असे सायना म्हणाली होती.
‘‘हिदायतने बॅडमिंटनसाठी दिलेल्या योगदानाचा आणि त्याच्या प्रतिष्ठेचा आदर न करता तौफिकसारख्या खेळाडूबाबत कुणी अशा पद्धतीने कसे उद्गार काढू शकतात, हेच मला समजत नाही. हे अत्यंत वाईट आहे. बॅडमिंटनमधील त्याने मिळवलेले यश कोणीही अमान्य करू शकत नाही. केवळ तो निवृत्त झाला आहे, या मुद्यावर तर नाहीच नाही. तो कायमच महान बॅडमिंटनपटू असेल आणि राहील आणि हे सगळं पैशाबाबत नाही तर सन्मानासंदर्भात आहे,’’ असे ज्वालाने सांगितले.  
‘‘आयबीएल ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आहे. भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. परंतु त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर खेळाडूंकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. तौफिकने मांडलेले विचार त्याचे वैयक्तिक होते. कदाचित यामुळे पुढच्या वर्षीच्या आयबीएलमध्ये काही सुधारणा होऊ शकतात. तौफिकला पैशांची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे भारतात सचिन त्याप्रमाणे इंडोनेशियात तौफिक आहे. त्यांच्या देशात बॅडमिंटन राष्ट्रीय खेळ आहे. सहकारी खेळाडूंच्या मतांशी सहमत नसाल तर हरकत नाही पण त्यांचा अनादर करू नका,’’ असा टोमणाही ज्वालाने सायनाला लगावला आहे. खेळाडूंच्या लिलावात शेवटच्या क्षणी पायाभूत किंमत निम्म्यावर आणण्यात आल्याने ज्वालाने स्पर्धेच्या सुरुवातीला संयोजकांवर टीका केली होती.