भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या भविष्यातील योजनांविषयी कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीला नक्कीच माहिती दिली असेल, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केली.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यापासून धोनीने विश्रांती घेतली आहे. त्यामुळेच त्याच्या निवृत्तीच्या चर्चाना दररोज उधाण येते आहे.

‘‘धोनीने त्याच्या भवितव्याविषयी कर्णधार आणि निवड समिती सदस्यांना नक्कीच कल्पना दिली असेल. त्यामुळे त्याविषयी अधिक चर्चा करणे निर्थक आहे, असे मला वाटते,’’ असे गांगुली म्हणाला.

‘‘धोनीने स्वत:हून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतीय क्रिकेटला अमूल्य योगदान दिले असून कोणता निर्णय योग्य-अयोग्य याची त्याला समज आहे,’’ असेही ४७ वर्षीय गांगुलीने

सांगितले. धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगणे स्वाभाविक असल्याने लवकरच मी स्वत: यासंबंधी कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा साधेन, असेही गांगुलीने सांगितले.

भारताने ट्वेन्टी-२० सामन्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा!

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवायचे असल्यास भारताने दृष्टिकोन बदलणे अत्यावश्यक आहे, असे गांगुलीने सुचवले. ‘‘भारतीय संघात विश्वचषक जिंकण्याची नक्कीच क्षमता आहे. परंतु प्रत्येक वेळी भारत धावांचा पाठलाग करूनच सामना जिंकण्यात विश्वास बाळगतो. त्यामुळे फलंदाजांनी विशेषत: कर्णधाराने दृष्टिकोन बदलून प्रथम फलंदाजी करून सामने जिंकण्यावरही भर दिला पाहिजे,’’ असे गांगुली म्हणाला.