भारताचे कसोटी कर्णधारपद मिळल्याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत विराट कोहलीने चार स्थानांनी आगेकूच करीत १५व्या स्थानावर झेप घेतली आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १६९ आणि दुसऱ्या डावात ५४ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे ७३७ गुणांसह कोहलीने १५वे स्थान पटकावले आहे.
कोहलीनंतर चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय हे अनुक्रमे १९ आणि २०व्या स्थानावर आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्या डावात १४७ आणि दुसऱ्या डावात ४८ धावांची खेळी साकारणाऱ्या अजिंक्य रहाणेने तब्बल १५ स्थानांनी आगेकूच करीत २६वे स्थान पटकावले आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १९२ धावांची खेळी साकारणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने कारकीर्दीतील सर्वोत्तम पाचवे स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्सने कुमार संगकाराला मागे टाकत अव्वल स्थान पुन्हा एकदा पटकावले आहे.
भारतीय गोलंदाजांमध्ये उमेश यादव व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी आठ स्थानांनी आगेकूच करीत अनुक्रमे ३६ व ३८वे स्थान गाठले आहे. कसोटीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये भारताचा आर. अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे.