गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा ६० धावांनी धुव्वा उडवल्यानंतर आता मुंबई इंडियन्सला वेध लागले आहेत ते ‘प्ले-ऑफ’ फेरीसाठीची दावेदारी मजबूत करण्याचे. गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवण्यासाठी घरच्या मैदानावर ‘आता होऊन जाऊ द्या’ असाच नारा असणार आहे.
वानखेडे स्टेडियमवरील पाचपैकी पाच सामने जिंकत मुंबई इंडियन्सने ‘घरच्या मैदानावर आम्हीच राजे’ असल्याचे दाखवून दिले. या विजयामुळे मुंबईने १४ गुणांसह अव्वल चार संघांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. या मोसमात खराब कामगिरी करणारा कोलकाता संघ मात्र ८ गुणांसह तळाच्या स्थानी फेकला गेला आहे. कोलकाताने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला हरवले असले तरी मुंबईला त्यांच्याच मैदानावर पराभूत करण्याचे खडतर आव्हान त्यांना पार करावे लागणार आहे. प्ले-ऑफ फेरीत मजल मारण्यासाठी कोलकाताला उर्वरित सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र मुंबईविरुद्ध त्यांची कामगिरी यापूर्वी सरस झालेली नाही. मुंबईविरुद्ध कोलकाताला नऊ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे तर दोनच सामने त्यांनी जिकंले आहेत.
गेल्या वर्षी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उभय संघांमधील सामन्यानंतर सुरक्षारक्षकांशी वाद घालणारा कोलकाताचा मालक शाहरूख खान याच्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनने पाच वर्षांची प्रवेशबंदी घातली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सामन्यात शाहरूखला वानखेडेवर हजर राहता येणार नाही.
चांगली सुरुवात करूनही सचिन तेंडुलकरला मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. रिकी पॉन्टिंगने कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर सचिनच्या साथीला ड्वेन स्मिथ सलामीला येत आहे. स्मिथने मिळालेल्या संधीचे सोने करत मुंबईला अनेक सामन्यांत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा बहरात आहेत. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सची गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. मिचेल जॉन्सन, प्रग्यान ओझा यांच्यासह हरभजन सिंग विकेट्स मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच चेन्नईच्या तगडय़ा फलंदाजीसमोर १३९ धावांचे आव्हान असूनही मुंबईने विजय मिळवला.
कोलकाता संघ सुनील नरिनच्या फिरकीवर अवलंबून आहे. कर्णधार गौतम गंभीरने तीन अर्धशतके झळकावत मोसमाची सुरुवात चांगली केली होती, पण दुसऱ्या टप्प्यात गंभीरची कामगिरी खालावली आहे. सलामीवीर अपयशी ठरल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवरील दडपण वाढत आहे. भरवशाचा फलंदाज जॅक कॅलिसच्या कामगिरीत सातत्य नाही. इऑन मॉर्गनने काही चांगल्या खेळी साकारल्या असल्या तरी युसूफ पठाणकडून आक्रमक खेळीची अपेक्षा कोलकाताला आहे. मिचेल जॉन्सन आणि लसिथ मलिंगाच्या भेदक गोलंदाजीसमोर टिकाव धरण्याचे आव्हान कोलकाताच्या आघाडीच्या फलंदाजांसमोर असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामना : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स<br />स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata knight riders face daunting task against mumbai indians
First published on: 07-05-2013 at 12:52 IST