विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘ओव्हर-थ्रो’च्या सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचा असला तरी त्या निर्णयाचे मला मुळीच शल्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकण्यापूर्वी फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले असेल, तरच ती धाव ग्राह्य़ धरली जाते. परंतु न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने चेंडू फेकला, तेव्हा ‘रिप्ले’मध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांनी त्यावेळी एकमेकांना ओलांडले नसल्याचे निदर्शनास आल्याने पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका न्यूझीलंडला बसला.

‘‘दूरचित्रवाणीत वारंवार रिप्ले पाहून मत व्यक्त करणे कोणासाठीही सोपे आहे. माझा निर्णय चुकला, हे मी मान्य करतो. परंतु प्रत्यक्षात मैदानावर आम्हाला रिप्ले पाहण्याची सोय नसते. कमी वेळेत अचूक निर्णय आम्हाला घ्यावा लागतो. त्याशिवाय ‘आयसीसी’नेही माझ्या निर्णयाचे कौतुक केले होते. त्यामुळे मला त्या निर्णयाविषयी मुळीच पश्चात्ताप नाही,’’ असे धर्मसेना म्हणाले.

या निर्णयाविषयी तिसऱ्या पंचांचे मत विचारात घेता आले असते, परंतु धर्मसेना आणि मरायस इरास्मस यांनी तसे न करता आपापसात चर्चा करून निर्णय दिला. ‘‘आयसीसीच्या नियमांनुसार फक्त फलंदाज बाद झाला असेल अथवा त्यासंबंधी काही निर्णय द्यावयाचा असेल तरच मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. परंतु यामध्ये किती धावा द्यायच्या हे ठरवायचे होते,’’ असे स्पष्टीकरण धर्मसेना यांनी दिले.