मोहाली कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडवर मजबूत पकड निर्माण केली असून दुसऱया डावात इंग्लंडचे चार फलंदाज अवघ्या ७८ धावांत माघारी परतले आहेत. भारतीय संघाकडे सध्या फक्त ५६ धावांची आघाडी असली तरी इंग्लंडचे चार महत्त्वाचे फलंदाज तंबूत दाखल झाल्याने इंग्लंड बिकट स्थितीत आहे. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४१७ धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडवर १३४ धावांची आघाडी घेतली. आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी यावेळी चमकदार कामगिरी केली. रवींद्र जडेजाने सर्वाधिक ९० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर अश्विनने ७२ धावांचे योगदान दिले. जयंत यादवने जडेजाला उत्तम साथ देऊन आंतरराष्ट्रीय कसोटीमधील आपले पहिलेवहिले अर्धशतक साजरे केले. जयंत यादवने ५५ धावा ठोकल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने यावेळी पाच विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू रशीदने चार भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोलंदाजांला यश मिळाले नाही.
दुसऱया डावात इंग्लंडचे चार फलंदाज स्वस्तात तंबूत दाखल झाले असून यात अश्विनने तीन, तर जयंत यादवने एक विकेट घेतली. इंग्लंडने यावेळी दुसऱया डावाची सुरूवात करण्यासाठी हमीदला सलामीसाठी न पाठवता कूकसोबत जो रुटला मैदानात पाठविण्यात आले. दोघांनी संयमी सुरूवा केली खरी पण अश्विनच्या अफलातून फिरकीवर कूक क्लीनबोल्ड झाला. त्यानंतर मोईन अली देखील मोठा फटका मारण्याच्या नादात स्वस्तात माघारी परतला. बेअरस्टो आणि रूट जोडी मैदानात जम बसवण्यास सुरूवात करत असतानाच जयंत यादवने ही जोडी फोडली. जयंतच्या गोलंदाजीवर बेअरस्टो यष्टीरक्षक पार्थिव पटेलकरवी झेलबाद झाला. पार्थिव पटेलने उत्कृष्ट झेल टीपला. आजच्या दिवसाच्या अखेरच्या षटकात अश्विनने भारतीय संघाला चौथे यश मिळवून दिले. दमदार फॉर्मात असलेल्या बेन स्टोक्सला अश्विनने पायचीत करून अवघ्या पाच धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
तत्पूर्वी, तिसऱया दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्यानंतर आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी संयमी फलंदाजी करत भारताला इंग्लंडवर आघाडी मिळवून दिली. भारताने तीनशेचा आकडा गाठल्यानंतर संघाला सातवा धक्का बसला. आर.अश्विन ७२ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. अश्विननंतर जडेजाने मैदानात टीच्चून फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. जयंत यादवनेही जडेजाला साजेशी साथ दिली. उपहारानंतरच्या सत्रात वोक्सच्या गोलंदाजीवर लागोपाठ तीन चौकार ठोकून जडेजाने आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली. पण मोठा फटका मारण्याच्या नादाज रशीदच्या फिरकीवर जडेजा लाँग ऑनवर झेलबाद झाला. जडेजाने यावेळी सर्वाधिक ९० धावा केल्या. जडेजा बाद झाल्यानंतर जयंत यादवने मैदानात जम बसवून आपले अर्धशतक साजरे केले. जयंत यादवच्या अर्धशतकीच्या जोरावर भारतीय संघाला चारशे धावांचा टप्पा गाठता आल्याने १०० हून अधिक धावांची आघाडी घेता आली. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर जयंत यादव ५५ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. मग बेन स्टोक्सने उमेश यादवला बाद करून सामन्यातील पाचवी विकेट घेतली आणि भारतीय संघाचा पहिला डाव ४१७ धावांत संपुष्टात आला. दुसऱया दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाला ६ बाद २७१ धावांपर्यंत मजल मारता आली होती. अश्विनने महत्त्वाच्या क्षणी मैदानावर टीच्चून फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस ८ बाद २६८ अशी अवस्था असलेल्या इंग्लंडचा डाव दुसऱया दिवसाच्या पहिल्या सत्रात मोहम्मद शमीने २८३ धावांत संपुष्टात आणला होता. इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरूवात चांगली झाली होती. मुरली विजय यावेळी अपेक्षित कामगिरी करू शकला नसला तरी पार्थिव पटेलने ४२ धावांचे योगदान दिले होते. दुसऱया सत्राच्या अखेरीस भारत २ बाद १४८ असा मजबूत स्थितीत होता. पण रविवारी तिसरे सत्र रोमांचक ठरले. तिसऱया सत्रात इंग्लंडने दमदार पुनरागमन केले होते. तिसऱया सत्राच्या खेळाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच षटकात रशीदने चेतेश्वर पुजाराला माघारी धाडले. पुजाराने ५१ धावांचे योगदान दिले. चेतेश्वर पुजाराने यावेळी आपले ११ वे आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आल्या पावली माघारी परतला, तर करुण नायर धावचीत होऊन अवघ्या चार धावांवर तंबूत दाखल झाला. त्यामुळे भारतीय संघाची अवस्था ५ बाद १५६ अशी केविलवाणी झाली होती. विराट कोहलीने कर्णधारी खेळी करत अर्धशतकी खेळी साकारली. पण तोही बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर ६२ धावांवर यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद झाला. संघाचे आश्वासक शिलेदार माघारी परतल्यामुळे भारतीय संघांवर संकट ओढावणार असे चित्र असताना अश्विन भारतीय संघासाठी संकट समयी पुन्हा एकदा धावून आला. अश्विनने मैदानात टीच्चून फलंदाजी करत रवींद्र जडेजाच्या साथीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आणि आपले ९ वे आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक पूर्ण केले. India vs England: दिवसभरातील अपडेट्स 
Live Updates
10:44 (IST) 28 Nov 2016
रवींद्र जडेजाचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार
10:41 (IST) 28 Nov 2016
रवींद्र जडेजाचे अर्धशतक, जडेजाकडून तलवारबाजी स्टाईलने सेलिब्रेशन
10:38 (IST) 28 Nov 2016
जयंत यादवकडून फाईन लेगच्या दिशेने एक धाव, ९९ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद ३१८ धावा
10:35 (IST) 28 Nov 2016
स्टोक्सच्या गोलंदाजीवर स्टोक्सचा कव्हर्सच्या दिशेने फटका, तीन धावा
10:31 (IST) 28 Nov 2016
९८ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद ३१३ धावा, भारताकडे ३० धावांची आघाडी
10:27 (IST) 28 Nov 2016
जयंत यादवचा खणखणीत चौकार
10:23 (IST) 28 Nov 2016
अश्विन बाद झाल्यानंतर जयंत यादव फलंदाजीसाठी मैदानात
10:21 (IST) 28 Nov 2016
भारतीय संघाला सातवा धक्का, अश्विन ७२ धावांवर झेलबाद
10:09 (IST) 28 Nov 2016
भारताने ३०० चा टप्पा गाठला
10:05 (IST) 28 Nov 2016
वोक्सच्या गोलंदाजीवर अश्विनचा डीप पॉईंटच्या दिशेने चौकार
10:04 (IST) 28 Nov 2016
९२ षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद २९२ धावा, भारताकडे ९ धावांची आघाडी
10:01 (IST) 28 Nov 2016
जडेजा अर्धशतकाच्या जवळ पोहोचला, भारताकडे ८ धावांची आघाडी
09:55 (IST) 28 Nov 2016
९० षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद २९० धावा.
09:53 (IST) 28 Nov 2016
भारताची आता आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू
09:53 (IST) 28 Nov 2016
भारताच्या धावसंख्येने २८३ चा आकडा गाठला
09:42 (IST) 28 Nov 2016
जडेजा आणि अश्विनची संयमी फलंदाजी
09:41 (IST) 28 Nov 2016
मोहाली कसोटीच्या तिसऱया दिवसाच्या खेळाला सुरूवात
Web Title: Live cricket score india vs england 3rd test day 3 scorecard ind vs eng
First published on: 28-11-2016 at 09:37 IST