|| प्रशांत केणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठवडय़ाची मुलाखत: अनुप कुमार, पुणेरी पलटणचे प्रशिक्षक

प्रो कबड्डी लीगचे पहिले सहा हंगाम यशस्वीपणे खेळल्याचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. नेमके हेच माझ्या पथ्यावर पडू शकेल, कारण राकेश कुमार वगळता अन्य कोणताही प्रशिक्षक प्रो कबड्डीचे सामने खेळलेला नाही. त्यामुळे सामन्यांच्या रणनीतीची उत्तम जाण मला आहे, असे मत पुणेरी पलटणचे प्रशिक्षक अनुप कुमारने व्यक्त केले.

अनुपने दोन आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रो कबड्डीचे पहिले पाच हंगाम यू मुंबाचे नेतृत्व करणाऱ्या अनुपला सहाव्या हंगामात जयपूर पिंक पँथर्समध्ये स्थान मिळाले; परंतु तो आपला अपेक्षित प्रभाव दाखवू न शकल्याने निवृत्तीचा मार्ग पत्करला. यंदाच्या हंगामात पुण्याला मार्गदर्शन करणाऱ्या अनुपशी केलेली खास बातचीत-

  • यशस्वी खेळाडू आणि कर्णधारपद भूषवल्यानंतर प्रशिक्षकाच्या नव्या भूमिकेकडे कशा पद्धतीने पाहतोस?

प्रशिक्षकाची भूमिका ही खेळाडूपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक आहे. खेळाडू सामने खेळतो आणि कधी चुका झाल्या, तर त्यातून धडा घेत पुन्हा प्रयत्न करतो; परंतु प्रशिक्षकाला संपूर्ण संघ हाताळायचा असतो. त्यांच्या चुकांचे निरीक्षण करून योग्य मार्गदर्शन करणे; त्यांचे खेळणे, राहणे, आहारविहार याकडे लक्ष द्यावे लागते. प्रो कबड्डीचा हंगाम प्रदीर्घ असतो. त्यांना या कालावधीसाठी तंदुरुस्त राखणे महत्त्वाचे असते.

  • प्रो कबड्डी सुरू झाल्यापासून कबड्डीपटूंची कारकीर्द लवकर संपुष्टात येऊ लागली आहे, याबाबत तुझे काय मत आहे?

प्रो कबड्डीमुळे खेळाडूच्या कारकीर्दीवर मर्यादा आली, असे मला अजिबात वाटत नाही. प्रत्येक खेळाडूला कळते की, आता आपल्याला थांबायला हवे, त्याच वेळी तो निवृत्त होतो. नवे खेळाडू आता उदयास येत आहेत. त्यांच्याशी अनुभवी खेळाडूंची कालांतराने तुलना करता येत नाही. कारण वयानुसार खेळात फरक पडतो. कबड्डी विकसित झाल्यामुळे प्रो कबड्डी, राष्ट्रीय कबड्डी, व्यावसायिक संघ आणि आंतरराष्ट्रीय सामने वाढले आहेत.

  • पुणेरी पलटणला मार्गदर्शन करताना यंदाच्या हंगामासाठी कोणत्या योजना आखल्या आहेत?

यंदाच्या हंगामात सर्वच संघ सक्षम झाले आहेत. प्रत्येक संघात तीन-चार अनुभवी आणि बरेचसे नवे खेळाडू आहेत. त्या दृष्टीने रणनीती आखून सामने खेळलो, तरच विजेतेपदापर्यंत पोहोचता येईल.

  • सहाव्या हंगामापासून प्रत्येक संघाची भिस्त उदयोन्मुख खेळाडूंवर आहे, याबाबत काय सांगशील?

अनुभवी खेळाडू सामन्याची योग्य रणनीती आखण्यासाठी उपयुक्त ठरतात; परंतु संघाची जबाबदारी ध्यानात घेऊन तो सावध खेळतो. पण युवा खेळाडू दडपण न बाळगता हिमतीने खेळतात. त्यांच्याकडून प्रत्येक प्रयत्नात १०० टक्के योगदान मिळते. त्यामुळे संघमालक आणि प्रशिक्षक युवा खेळाडूंना प्राधान्य देत आहेत.

  • कबड्डीच्या व्यासपीठावर उत्तरेकडील राज्यांतून मोठय़ा प्रमाणात गुणवत्ता दिसू लागली आहे, याचे कारण काय असू शकते?

उत्तरेकडील राज्यांमध्ये शरीराला पूरक आहार आम्हाला घरातून मिळतो. दूध, तूप यांच्यासारखे पौष्टिक पदार्थ पुरेशा प्रमाणात मिळतात. याशिवाय कबड्डीसाठी पोषक वातावरण तिथे उपलब्ध आहे. दुखापतीची तमा न बाळगता उत्तरेकडील खेळाडू खेळतात. याचप्रमाणे येथील राज्य शासनांकडून नोकऱ्या आणि इनाम यांद्वारे गुणवत्तेला प्रोत्साहन दिले जाते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta interview with anup kumar mpg
First published on: 22-07-2019 at 00:51 IST