भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याला लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत अनुकूल ‘ड्रॉ’ लाभला असला तरी पुन्हा अव्वल स्थानावर येण्यासाठी त्याची कसोटीच ठरणार आहे. या स्पर्धेस रविवारपासून येथे प्रारंभ होत आहे.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या आनंदच्या दृष्टीने ही स्पर्धा कसोटीच ठरणार आहे.  नुकत्याच झालेल्या मास्टर्स स्पर्धेत त्याला पाचवे स्थान मिळाले होते. लंडन क्लासिक स्पर्धेत त्याला प्रामुख्याने मॅग्नुस कार्लसन (नॉर्वे), लिवॉन आरोनियन (अर्मेनिया) व व्लादिमीर क्रामनिक (युक्रेन) यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. त्याखेरीज जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू ज्युडिथ पोल्गार (हंगेरी) तसेच हिकारु नाकामुरा (अमेरिका) यांचाही या स्पर्धेत सहभाग आहे.
अव्वल साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत आनंदला ल्युक मॅकश्ॉनी याच्याशी खेळावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाचा खेळाडू कार्लसन याच्याशी शेवटच्या फेरीत आनंदची लढत होणार आहे. मॅकश्ॉनी याने कार्लसन याच्यावर गत स्पर्धेत सनसनाटी मात केली होती. या स्पर्धेत आनंदला क्रामनिक व आरोनियन या तुल्यबळ खेळाडूंबरोबरही खेळावे लागणार आहे.