मिश्र आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभव

ह्युस्टन : भारताची आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदकांनी हुलकावणी दिली. मिश्र आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागल्याने तिचे या स्पर्धेतील आव्हान पदकाविना संपुष्टात आले.

जागतिक स्पर्धेतील पहिल्या पदकापासून केवळ एक विजय दूर असणाऱ्या मनिका आणि जी. साथियन या अनुभवी जोडीला चांगला खेळ करता आला नाही. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांना टोमाकाझू हारिमोटो आणि हिना हयाता या जपानी जोडीने १-३ (५-११, २-११, ११-७, ९-११) असे पराभूत केले. मनिका पदक पटकवण्याच्या दुसऱ्या प्रयत्नातही अपयशी ठरली. महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मनिका आणि अर्चना कामत या भारतीय जोडीवर सारा डी नुट्टे आणि झिया लिन नी या लक्झेम्बर्गच्या जोडीने ०-३ (१-११, ६-११, ८-११) अशी सरळ गेममध्ये मात केली. याआधी २०१६ मध्येही उपांत्यपूर्व फेरीतील पराभवामुळे मनिकाचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक हुकले होते.