भारतीय टेनिस संघ निवडताना भविष्यात वादंग होऊ नये म्हणून अखिल भारतीय टेनिस संघटनेने राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी डेव्हिसपटू एस. पी. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान अध्यक्ष अनिल धूपर यांच्याऐवजी त्यांना संधी देण्यात आली आहे.
समितीमधील रोहित राजपाल, बलरामसिंग, झिशान अली व नंदन बाळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, मात्र धूपर यांनी कधीही भारताचे प्रतिनिधित्व केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत संघटनेतील काही वरिष्ठ सदस्यांनी अनेक वेळा टीका केली होती. ही टीका टाळावी म्हणून आम्ही मिश्रा यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे असे संघटनेचे सरचिटणीस भरत ओझा यांनी सांगितले.
मिश्रा यांनी खेळाडूबरोबरच न खेळणारा कर्णधार म्हणून डेव्हिस चषक स्पर्धेत भारताकडून भाग घेतला आहे. मिश्रा यांनी नव्या जबाबदारीचे स्वागत करीत सांगितले, माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी निश्चित यशस्वी करीन.
संघटनेने शासनाबरोबर निधी व अन्य कामांकरिता संपर्क ठेवण्यासाठी सुमन कपूर, राजपाल, विशाल उप्पल व हिरोन्मोय चटर्जी यांची उपसमिती नियुक्त केली आहे. पुढील वर्षी देशात ३६ आंतरराष्ट्रीय फ्युचर्स व चॅलेंजर स्पर्धा, तसेच कनिष्ठ खेळाडूंसाठी १० आयटीएफ स्पर्धा घेण्याचे संघटनेने ठरविले आहे. तसेच पुढील वर्षीची फेडरेशन चषक स्पर्धा आयोजित करण्याची संधी तेलंगणा राज्य टेनिस संघटनेला देण्यात आली आहे.