भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून संकेत

भारताला दोनदा विश्वविजेतेपद जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसह निवृत्ती पत्करण्याची शक्यता आहे. म्हणजेच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारताचा जो अखेरचा सामना असेल, तोच धोनीचाही शेवटचा सामना ठरणार असेल, असे  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांकडून समजते.

जर भारतीय संघ १४ जुलैला होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला, तर या महान क्रिकेटपटूला जगज्जेतेपदासह क्रिकेटविश्वाला अलविदा करता येईल. ‘‘चालू विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता कमी आहे. धोनीचे निर्णय हे असेच असतात. ज्या पद्धतीने त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचे नेतृत्व सोडले, ते पाहता त्याने हा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

सध्याची राष्ट्रीय निवड समिती ही ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत कार्यरत असेल. याचप्रमाणे पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असल्यामुळे त्या दृष्टीने संघबांधणीची प्रक्रिया आता सुरू होईल. त्यामुळे धोनीने एकदिवसीय विश्वचषकासह निवृत्ती पत्करल्यास ट्वेन्टी-२०मध्ये नव्या बदलाला योग्य वाव मिळू शकेल.

मंगळवारी बांगलादेशला नमवून भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे या संवेदनक्षम विषयावर ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी आणि संघ व्यवस्थापन यांनी बोलायचे टाळले आहे. चालू विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील काही सामन्यांत धोनीच्या दृष्टिकोनावर काही माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी टीका केली. यात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचाही समावेश होता. सर्वोत्तम विजयवीर या त्याच्या क्षमतेवरही काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने त्याची पाठराखण केली. कठीण प्रसंगातील रणनीतीसाठी भारतीय संघ धोनीवर विसंबून असतो. अगदी तिसऱ्या पंचांकडे दाद मागतानाही धोनीकडे आधी विचारणा केली जाते.

‘‘२०१७च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर संघ व्यवस्थापनाने एक निर्णय घेतला. तो म्हणजे २०१९च्या विश्वचषकापर्यंत धोनी भारतीय संघासोबत असेल. आता त्याची कामगिरी फारशी चांगली होत नसतानाही, भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारतीय संघातल्या उणिवांवर फारशी चर्चा होत नाही,’’ असे एका माजी क्रिकेटपटूने सांगितले. ‘‘कुणीही धोनीला निवृत्त व्हायला सांगत नाही. परंतु विश्वचषकानंतर परिस्थिती बदलेल, याची त्याला कल्पना आहे,’’ असे त्याने पुढे सांगितले.

धोनीने संघासाठी योग्य तेच केले -सचिन

बर्मिगहॅम : महेंद्रसिंह धोनीच्या दृष्टिकोनात कोणतीही चूक नाही. संघासाठी जे योग्य होते, तेच केले, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या धोनीच्या फलंदाजीबाबत सचिनने टीका केली होती. मात्र काही दिवसांतच त्याने आपले मत बदलले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीने ३३ चेंडूंत ३५ धावा केल्या. त्यामुळे भारताला अखेरच्या १० षटकांत फक्त ६३ धावा करता आल्या. त्याच्या संथ खेळीबाबत समाजमाध्यमांवर टीका होत आहे. परंतु धोनीची खेळी ही महत्त्वाची होती, असे मत सचिनने व्यक्त केले आहे.

‘‘संघासाठी जे योग्य होते, नेमके तेच त्याने केले. तो ५०व्या षटकापर्यंत मैदानावर थांबला, तर अन्य फलंदाजांनाही त्याची मदत होते. त्याच्याकडील अपेक्षांची त्याने पूर्तता केली आहे,’’ असे सचिनने म्हटले आहे.