एम. एस. धोनीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अखेरपर्यंत फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. ज्याप्रमाणे धोनीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फिनिशरची भूमिका चोख बजावली त्याप्रमाणे यापुढेही धोनी अखेरपर्यंत मैदानावर थांबून अनुभवाच्या जोरावर भारताला सामना जिंकून देईल, असा विश्वास सचिन तेंडुलकरने व्यक्त केला.

दुसऱ्या सामन्यातील धोनीच्या फलंदाजीचे सचिनने कौतुक केले. मैदानावर अखेरपर्यंत थांबून संघाला विजय मिळवून देण्याचे कौशल्य धोनीकडे आहे. त्याचा भारतीय संघाला फायदा होईल असेही सचिन म्हणाला. सचिनने आपल्या १०० एमबी अॅपच्या माध्यमातून धोनीच्या मॅच फिनिशंगची प्रशंसा केली. तो म्हणाला की, दुसऱ्या सामन्यातील धोनीचे योगदान महत्वपुर्ण होते. पहिल्या सामन्यात त्याला लय सापडली नव्हती. चेंडू धोनीच्या बॅटवर येत नव्हता. मात्र, दुसऱ्या सामन्यात धोनी आपल्या लयीत दिसला. मैदानावर आल्यानंतर पहिल्या चेंडूपासून धोनीने विचारपूर्वक आणि संयमी फलंदाजी केली.

डावाला आकार देण्यात आणि फिनिशिंगमध्ये धोनी आता तरबेज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फॉर्मवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण धोनीने दुसऱ्या सामन्यात निर्णायक अर्धशतकी खेळी करत सर्वच टीकाकारांना उत्तरे दिली. अनुभवाच्या जोरावर भारताच्या विजयाता धोनीने महत्वाची भूमिका बजवाली आहे.

दरम्यान, तीन सामन्याची मालिका १-१ अशी बरोबर आहे. अखेरचा सामना जिंकून मालिका विजयाचा दोन्ही संघाचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर भारताने दुसऱ्या सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली होती.