मुंबईने १३२ धावांचे दिलेले लक्ष्य वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीमुळे (२५ धावांत ३ बळी) बंगालला पेलण्यात अपयश आले. मुंबईने शनिवारी बंगालला १० धावांनी नमवून मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब-गटातून दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.

वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने मुंबईच्या विजयात अडथळा ठरणाऱ्या रित्विक रॉय चौधरीला (३०) बाद केले, तर शिवम दुबेने कैफ अहमदला (३१) तंबूची वाट दाखवली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी केली. मग बंगालला अखेरच्या षटकांत विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती; परंतु अवस्थीने शहबाझ अहमद (१२) आणि रितिक चॅटर्जी (०) यांना लागोपाठच्या चेंडूंवर तंबूची वाट दाखवली आणि मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी, मुंबईने निर्धारित षटकांत ७ बाद १३१ धावा केल्या. दुबेने सर्वाधिक २४ धावा केल्या. या विजयानिशी मुंबईने सरस निव्वळ धावगतीच्या बळावर बंगालला मागे टाकले आहे. कर्नाटकचा संघ तीन विजयांनिशी गटात अग्रस्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : २० षटकांत ७ बाद १३१ (शिवम दुबे २४; रितिक चॅटर्जी २/१९) विजयी वि. बंगाल : २० षटकांत ८ बाद १२१ (कैफ अहमद ३१; मोहित अवस्थी ३/२५, सिद्धेश लाड २/१६)

’  गुण : मुंबई ४, बंगाल ०