मुंबईने तिसऱ्या दिवशीच चाळिसाव्या विजेतेपदाला गवसणी घातली आणि चाळीस वर्षांपूर्वीच्या विजेतेपदाची आठवण झाली. साल १९७२-७३, रणजीचा अंतिम सामना मुंबई वि. तामिळनाडू. चेन्नईची खेळपट्टी आखाडा बनवलेली (फिरकीला पोषक) होती ती वेंकटराघवन आणि कुमार या दोन्ही फिरकीपटूंना मदत मिळावी अशीच. पण मुंबईच्या संघात फिरकीचे जादूगार असलेले पद्माकर शिवलकर असल्याची आठवण त्यांना राहिली नाही आणि त्यांची ससेहोलपट झाली. शिवलकरांनी या सामन्यात १३ बळी मिळवत मुंबईला एकहाती सामना जिंकवून दिला आणि तोही तिसऱ्या दिवशी (दोन दिवस आणि एक चेंडू), त्यामुळेच चाळिसावा विजय डोळ्यासमोर असताना ४० वर्षांपूर्वीच्या विजयाची आठवण झाली. ४० व्या विजयाबद्दल १९७२-७३ च्या सलग पंधराव्या विजयाचे शिल्पकार ठरलेले शिवलकर म्हणाले की, मुंबईचे विजय आणि विक्रम होतच राहणार, मुंबईचा अश्वमेध कधीही थांबणार नाही. कारण मुंबईचा संघ हा नेहमीच दादा संघ असतो. या वर्षीही आपली कामगिरी चांगलीच झाली. मुंबईच्या संघात तळाचे फलंदाजही चांगली फलंदाजी करतात, त्यामुळे मुंबईला आता शेपूट उरलेले नाही. माझ्याकडून संघाला शुभेच्छा. यापुढे कामगिरीत सातत्य ठेवायला हवे, असे शिवलकर म्हणत होते.
तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यातील आठवणी सांगताना शिवलकर थोडेसे भावुक झाले होते. त्या वेळचे क्रिकेट आणि आताचे क्रिकेट यामध्ये फरक आहे. त्यामुळे त्या संघाची तुलना या संघाबरोबर करता येणार नाही. त्या वेळी चेंडूही फार कडक असायचा. त्यामुळे चेंडू लगेच वळायचा नाही. तामिळनाडूच्या पहिल्या डावात ६० धावांवर २ विकेट्स होत्या. पण त्यानंतरच्या दिवशी ४-५ षटकांमध्ये आम्ही त्यांना एकूण ८१ धावांवर गुंडाळले. त्यानंतर विजयासाठी आम्ही त्यांच्यापुढे जवळपास दीडशेचे आव्हान ठेवले होते. पहिल्या डावात शंभर धावांमध्ये त्यांना बाद केल्याने दुसऱ्या डावात आम्ही त्यांना लवकर बाद करू हा विश्वास होताच, घडलेही तसेच. आम्ही त्यांना ६१ धावांवर बाद करत सलग पंधराव्यांदा रणजी विजेतेपदावर मुंबईचे नाव कोरले होते.