मुंबई : हार्दिक तामोरेचे (२३३ चेंडूंत ११४ धावा) निर्णायक शतक व पृथ्वी शॉ च्या (९३ चेंडूंत ८७ धावा) आक्रमक अर्धशतकाच्या बळावर मुंबईने बडोदाविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर ९ बाद ३७९ धावा केल्या. मुंबईकडे ४१५ धावांची आघाडी असून संघ या सामन्यात भक्कम स्थितीत पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईने चौथ्या दिवशी १ बाद २१ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. पण, मोहित अवस्थीच्या (४) रुपात संघाला दुसरा धक्का बसला. यानंतर पहिल्या डावातील द्विशतकवीर मुशीर खानने (३३) तामोरेसह संघाचा डाव सांभाळला. दोघांनीही तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. पण, भट्टने मुशीरला बाद करीत ही भागीदारी मोडीत काढली. यानंतर मैदानात आलेल्या पृथ्वीने बडोदाच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळ केला. तर, तामोरेने यादरम्यान संघाची दुसरी बाजू सांभाळली. दोघांनीही मिळून चौथ्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी रचत संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. भट्टने पृथ्वीला माघारी धाडले. कर्णधार अजिंक्य रहाणेची खराब लय या सामन्यातही कायम राहिली व त्याला भोपळाही फोडता आला नाही.

हेही वाचा >>>यशासाठी भुकेलेल्यांनाच संधी! संघरचनेबाबत कर्णधार रोहित शर्माचे स्पष्ट विधान

रहाणे माघारी परतल्यानंतर अष्टपैलू शम्स मुलानीने (५४) तामोरेच्या साथीने संघाच्या धावसंख्येत भर घातली. दोघांनीही सहाव्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी केली. दरम्यान, तामोरेने शतक झळकावले. आपल्या या खेळीत त्याने १० चौकार झळकावले. महेश पिठियाने तामोरेला बाद करीत ही भागीदारी मोडीत काढली. यानंतर मैदानात आलेले सूर्यांश शेडगे (१०) व शार्दूल ठाकूर (१०) यांना जास्त काही करता आले नाही. तर, मुलानीही माघारी परतला. त्यामुळे संघाची अवस्था ९ बाद ३३७ अशी झाली. मग, तनुष कोटियन (नाबाद ३२) व तुषार देशपांडे (नाबाद २३) या तळाच्या फलंदाजांनी दिवसअखेरपर्यंत संघाच्या धावसंख्येच भर घातली. बडोदाकडून भार्गव भट्टने (७/१४२) चांगली गोलंदाजी केली.

हेही वाचा >>>Ranji Trophy : मध्य प्रदेशची सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक! कर्नाटकला २६८ धावांची गरज, तर मुंबईकडे ४१५ धावांची आघाडी

मध्य प्रदेश उपांत्य फेरीत

मध्य क्रमातील फलंदाज हनुमा विहारीच्या (५५) खेळीनंतरही आंध्र प्रदेशने चौथ्या दिवशी विजयाची संधी गमावली. विजयासाठी १७० धावांचे आव्हान असताना तिसऱ्या दिवसअखेरीस आंध्रने ४ बाद ९५ अशी मजल मारली होती. विजयासाठी आणखी ७५ धावांची आवश्यकता असताना आंध्रचा डाव १६५ धावांत संपुष्टात आला. मध्य प्रदेशाच्या अनुभव अगरवालने ५२ धावांत ६ गडी बाद केले.

गोलंदाजांच्या कामगिरीने कर्नाटकाला संधि

वेगवान गोलंदाज विद्वत कावेरप्पा आणि वैश्याक विजयकुमार यांच्या गोलंदाजीने रणजी उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या दिवस अखेर विजयाचे पारडे कर्नाटकाच्या बाजूने झुकले. सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी ३७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकाने दिवसअखेरीस १ बाद १०३ अशी आश्वासक मजल मारली होती. खेळ थांबला तेव्हा कर्णधार मयांक अगरवाल ६१, तर के.व्ही. अनीश एक धाव काढून नाबाद होते. त्यापूर्वी विदर्भाचा दुसरा डाव १९६ धावांत आटोपला.कर्नाटकाला विजयासाठी अजून २६८ धावांची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai vs baroda ranji trophy trophy hardik tamore century amy
First published on: 27-02-2024 at 07:07 IST