India beat Zimbabwe by 100 runs : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. भारताने अभिषेक शर्माच्या वादळी शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेचा १०० धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक-ऋतुराजच्या १३७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर २ गडी गमावून २३४ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघ १८.४ षटकांत १३४ धावांवर गारद झाला. त्याचबरोबर मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

अभिषेक-ऋतुराजची १३७ धावांची उत्कृष्ट भागीदारी –

अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी १३७ धावांची उत्कृष्ट भागीदारी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. अभिषेकने ४७ चेंडूत १०० धावा केल्या, तर दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने ४७ चेंडूत ७७ धावा केल्या. या शानदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या खेळात २३४ धावा केल्या होत्या. यजमान झिम्बाब्वे जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा संघाला खराब सुरुवातीच्या धक्क्यातून सावरता आले नाही. वेस्ली मधवेरेने खूप प्रयत्न केले, पण तो ३९ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला.

२३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला पहिल्याच षटकातच मुकेश कुमारने इनोसंट कैयाला अवघ्या ४ धावांवर क्लीन बोल्ड केल्याने मोठा धक्का बसला. वेस्ली माधवेरे आणि ब्रायन बेनेट यांनी मिळून ३६ धावांची भर घातली असली तरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना बेनेट मुकेशच्या गोलंदाजीवर बाद झाला. एकेकाळी झिम्बाब्वेची धावसंख्या एका विकेटवर ४०धावा होती, पण पुढच्या ६ धावांतच संघाने ३ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या.

सातत्याने विकेट्स गमावल्याचा झिम्बाब्वेला फटका –

दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेने एकाच वेळी अनेक विकेट्स गमावल्या. एका विकेटवर ४० धावांवरून संघाची धावसंख्या ४ गडी बाद ४६ अशी झाली. कर्णधार सिकंदर रझालाही केवळ ४ धावा करता आल्या. झिम्बाब्वेसोबतच्या एकाच सामन्यात दुसऱ्यांदा असे घडले की संघाने ४ गडी गमावून ७२ धावा केल्या होत्या. पण इथून झिम्बाब्वेने ४ धावांतच ३ विकेट्स गमावल्या. एकाच वेळी बसलेल्या अनेक धक्क्यातून संघ सावरू शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाची दमदार गोलंदाजी –

मुकेश कुमारने टीम इंडियासाठी विकेट्स घेण्यास सुरुवात केली. त्याने सलामीच्या स्पेलमध्ये २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई पुन्हा एकदा यशस्वी ठरला त्याने ४ षटकांत केवळ ११ धावांत २ विकेट्स घेतल्या. भारताकडून आवेश खान आणि मुकेश कुमार यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या, या दोघांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरलाही एक विकेट घेण्यात यश आले.