पीटीआय, लंडन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जसप्रीत बुमराची पहिल्या डावातील जादूई कामगिरी हा भारत आणि इंग्लंड या संघांमधील मुख्य फरक होता. बुमराच्या भेदक माऱ्यामुळेच भारताला दुसरा कसोटी सामना जिंकता आला, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले.

विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बुमराने दोन डावांत मिळून नऊ गडी बाद केले. विशेषत: पहिल्या डावात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ४५ धावांत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले. त्याने ‘रिव्हर्स स्विंग’चा उत्तम वापर केला. त्याच्या कामगिरीमुळे भारताने दुसरा सामना जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

हेही वाचा >>>U19 WC 2024 Semi Final : भारत अंतिम फेरीत; बीडच्या सचिन धसची ९६ धावांची निर्णायक खेळी

‘‘माझ्या मते बुमराची जादुई कामगिरी हा दोन संघांमधील मुख्य फरक होता. त्याने दुसऱ्या डावात तीन बळी मिळवले. मात्र, पहिल्या डावात सपाट खेळपट्टीवर त्याने केलेली गोलंदाजी फारच अप्रतिम होती. त्याने सहा बळी मिळवताना इंग्लंडला २५३ धावांत गुंडाळले आणि त्यानंतर इंग्लंडला पुनरागमन करणे शक्य झाले नाही,’’ असे हुसेन म्हणाला.

‘‘काही वेळा तुम्ही आपल्या संघाच्या कामगिरीकडे पाहता आणि आपण आणखी काय चांगले करू शकलो असतो, असा विचार करता. मात्र, काही वेळा तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला श्रेय देणेही गरजेचे असते. प्रतिस्पर्धी संघातील एखाद्या खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याचे आपल्याकडे उत्तर नव्हते हे मान्य करण्यात काहीच कमीपणा नाही,’’ असेही हुसेनने नमूद केले.

‘‘इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराने जशी गोलंदाजी केली, त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्याची गोलंदाजीची शैली (अ‍ॅक्शन) जरा वेगळी आहे. चेंडू टाकताना त्याच्या शरीराचा भार डावीकडे अधिक असतो. त्यामुळे फलंदाजाला चेंडू खेळताना अडचण येते. त्यातच चेंडू ‘रिव्हर्स स्विंग’ होत असल्यास बुमरासमोर खेळताना फलंदाजाचे काम अधिकच अवघड होते,’’ असेही हुसेन म्हणाला.

हेही वाचा >>>SAT20 : धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवत स्टार क्रिकेटपटूला लुटले, दक्षिण आफ्रिकेतील घटना

इंग्लंडने खेळ उंचावणे गरजेचे

दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ उर्वरित तीन कसोटीत अधिक दर्जेदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. अशात इंग्लंडने आपला खेळ उंचावणे गरजेचे आहे, असे हुसेनला वाटते. ‘‘पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाला आपल्या काही अनुभवी खेळाडूंविना खेळावे लागले. मोहम्मद शमी बहुधा संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. रवींद्र जडेजा पुढील कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. विराट कोहलीही पहिल्या दोन्ही कसोटीत खेळला नाही. हे सर्व भारतासाठी फार महत्त्वाचे खेळाडू आहेत. कोहली आणि केएल राहुल यांचे पुढील सामन्यात पुनरागमन होऊ शकेल. त्यामुळे भारताची ताकद वाढेल. उर्वरित तीन सामन्यांत त्यांचेच पारडे जड असेल. त्यामुळे इंग्लंडने आपला खेळ उंचावणे गरजेचे आहे,’’ असे हुसेन म्हणाला.

जो रूट इंग्लंडचा सर्वात अनुभवी आणि यशस्वी फलंदाज आहे. मात्र, बुमराविरुद्ध नक्की कशी फलंदाजी करावी याबाबत तो संभ्रमात आहे. बुमराने कसोटी क्रिकेटमध्ये आठ वेळा रूटला बाद केले आहे. बुमराने ऑली पोपला टाकलेला यॉर्करही उत्कृष्ट होता. पोपकडे त्याचे उत्तर नव्हते. त्याने बेन स्टोक्सलाही माघारी धाडले. बुमराने पुन्हा आपला त्रिफळा उडवला यावर स्टोक्सचा विश्वासच बसत नव्हता. बुमराची ही कामगिरी उल्लेखनीय होती.  – नासिर हुसेन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasir hussain opinion on india england second test match sport news amy
First published on: 07-02-2024 at 04:04 IST