शांघायमध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केल्यामुळे आगामी ऑलिम्पिकसाठी माझा आत्मविश्वास उंचावला आहे, असे आंतरराष्ट्रीय धावपटू सुधा सिंगने येथे सांगितले.

आशियाई विजेती ललिता बाबरने पंधरा दिवसांपूर्वी नोंदविलेला विक्रम मोडून काढीत सुधाने ९ मिनिटे २६.५५ सेकंद असा हा विक्रम नोंदविला. तिने ही कामगिरी करताना आठवे स्थान मिळविले. या दोन्ही खेळाडू निकोलाय स्नेश्रेएव या परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. २०१४ मध्ये सुधाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर शांघाय येथील डायमंड लीग स्पर्धेद्वारेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पुनरागमन केले आहे. बरेच महिने पोटाच्या आजारपणामुळे ती आंतरराष्ट्रीय स्पर्धापासून लांब होती.

राष्ट्रीय विक्रमाबाबत सुधाने सांगितले, ‘शांघाय येथे भरपूर थंडी असते, त्यामुळे आम्ही स्पर्धेपूर्वी काही दिवस अगोदरच तेथे गेलो होतो. तेथे आम्हाला भरपूर सराव करण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष शर्यतीच्या वेळीही खूप कडाक्याची थंडी होती, मात्र प्रत्यक्ष शर्यत सुरू झाल्यानंतर मला त्याचा काहीही त्रास झाला नाही. शर्यतीत चांगली कामगिरी करायची आहे याच हेतूने मी धावले व राष्ट्रीय विक्रम करू शकले.’

सुधाने यंदा २९ एप्रिल रोजी झालेल्या फेडरेशन स्पर्धेत ९ मिनिटे ३१.८६ सेकंद अशी वेळ नोंदवीत ऑलिम्पिक तिकीट निश्चित केले होते.

ललिताने सांगितले, ‘शांघाय येथील स्पर्धेत मी नेहमीच्या शैलीने धावू शकले नाही, मात्र काही वेळा अशा गोष्टी होत असतात. ऑलिम्पिकसाठी मला अधिक चांगली कामगिरी करायची आहे व त्यादृष्टीने मी सरावावर लक्ष केंद्रित करणार आहे.’

ललिताने शांघाय येथील स्पर्धेत ९ मिनिटे ४३.३० सेकंद वेळ नोंदवीत तेरावे स्थान घेतले.