इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : विक्रमी बोली! ; दोन नव्या संघांचा ‘आयपीएल’मध्ये प्रवेश

दुबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात एकूण १० समूहांनी संघांच्या खरेदीसाठी आपली दावेदारी सांगितली.

* लखनऊ आरपीएसजी, तर अहमदाबाद सीव्हीसी कॅपिटलकडे

दुबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या पुढील हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार असून अनुक्रमे आरपीएसजी समूह आणि सीव्हीसी कॅपिटल यांनी विक्रमी बोली लावत या संघांचे मालकी हक्क प्राप्त केले.

‘आयपीएल’मधील नव्या संघांवर मिळून १० हजार कोटी रुपयांपर्यंतची बोली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात आरपीएसजी आणि सीव्हीसी यांनी मिळून तब्बल १२,७१५ कोटी रुपये (साधारण १.७ बिलियन डॉलर) खर्ची करत दोन नवे संघ खरेदी केले. या संघांची लिलाव प्रक्रिया सोमवारी पार पडली. संजीव गोएंका यांच्या आरपीएसजी समूहाने तब्बल ७,०९० कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावत लखनऊ संघाची मालकी मिळवली. तसेच सीव्हीसी कॅपिटलने ५,६२५ कोटी रुपयांच्या बोलीसह दुसऱ्या संघाची मालकी मिळवताना घरचे मैदान म्हणून अहमदाबादला पसंती दिली.

दुबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात एकूण १० समूहांनी संघांच्या खरेदीसाठी आपली दावेदारी सांगितली. इंग्लंडमधील फुटबॉल संघ मँचेस्टर युनायटेडच्या मालकांसह अदानी समूहानेही या संघांसाठी बोली नोंदवली. लिलावात भाग घेतलेल्या समूहांना अहमदाबाद, लखनऊ, कटक, धरमशाला, गुवाहाटी आणि इंदूर यांच्यापैकी एका शहराची निवड करण्याची मुभा देण्यात आली होती.

सर्व समूहांकडून वैयक्तिक आणि आर्थिक माहिती स्पष्ट करणारी कागदपत्रे, तसेच संघ खरेदीसाठीची बोली असे दोन लिफाफे मागवण्यात आले. ‘बीसीसीआय’च्या कायदा आणि ऑडिट अधिकाऱ्यांनी पहिल्या लिफाफ्यातील कागदपत्रांची तपासणी केल्यावर दुसरे लिफाफे उघडले. या प्रक्रियेअंती सर्वोच्च बोली असणाऱ्यांना नव्या संघांचे मालकी हक्क मिळाले.

अदानीची ५१०० कोटींची बोली

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ंपैकी एक गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहाला ‘आयपीएल’च्या नव्या संघाचे मालकी हक्क मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यांनी संघ खरेदी करण्यासाठी ५१०० कोटी रुपयांची बोली लावली, पण ती अपुरी ठरली. तसेच लिलावादरम्यान ‘बीसीसीआय’चे संयोजक असलेल्या कंपन्यांपैकी एकाचे प्रतिनिधी अदानीसोबत आले. मात्र, यामुळे ‘बीसीसीआय‘च्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ‘त्या’ कंपनीच्या प्रतिनिधीला बाहेर पाठवण्यात आले.

‘आयपीएल’मध्ये दोन नव्या संघांचे स्वागत करताना ‘बीसीसीआय’ला खूप आनंद होत आहे. मी ‘आरपीएसजी’ आणि ‘सीव्हीसी कॅपिटल’चे यशस्वी बोलीबद्दल अभिनंदन करतो. दोन नव्या संघांमुळे आपल्या देशातील आणखी युवा स्थानिक क्रिकेटपटूंना पुढे येऊन जागतिक स्तरावर नाम कमावण्याची संधी मिळेल.

-सौरव गांगुली, ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष        

पुढील हंगामात ७४ सामने

‘आयपीएल’च्या पुढील म्हणजेच १५व्या हंगामात एकूण १० संघ खेळणार असून ७४ सामने होतील. प्रत्येक संघ सात सामने घरच्या आणि सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New ipl teams cvc capital rpsg win bids for ahmedabad lucknow zws

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या