दक्षिण कोरियात १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पथकात किती खेळाडू असावेत, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही,असे केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनवाल यांनी सांगितले. खेळाडूंच्या सहभागाबाबत भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) व अनेक राष्ट्रीय क्रीडा संघटनांकडून दडपण येत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा करून एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे सोनवाल यांनी स्पष्ट केले.
गुवांगझाऊ (चीन) येथे २०१०मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ६२६ खेळाडू व २००पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांचे पथक पाठविले होते. आगामी आशियाई स्पर्धेसाठी आयओएने ६६५ खेळाडू व २७० प्रशिक्षक व अधिकाऱ्यांचे पथक पाठविण्याची शिफारस केली आहे. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांनी सातशेपेक्षा जास्त जणांचे पथक पाठविता येणार नाही असे कळविले आहे.