सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर बेपत्ता

चिनी खेळाडू पेंग श्वेइशी अजूनही थेट संवाद शक्य झाला नसून तिच्या सुरक्षिततेची खात्री पटेपर्यंत चीनमध्ये महिलांच्या टेनिस स्पर्धा आयोजित करणार नसल्याचे महिला टेनिस संघटनेने (डब्ल्यूटीए) सांगितले आहे.

पेंगने दोन आठवड्यांपूर्वी चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उप-उच्चाधिकारी (व्हाईस प्रीमियर) झांग गाओली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. जागतिक दुहेरी क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू पेंग पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत चीनमध्ये महिलांच्या टेनिस स्पर्धा होणार नसल्याचे ‘डब्ल्यूटीए’चे अध्यक्ष स्टिव्ह सायमन यांनी सांगितले आहे.

पेंग सुरक्षित असून बीजिंगमध्ये असल्याचे चिनी टेनिस संघटनेने ‘डब्ल्यूटीए’ला कळवले आहे. मात्र, आमची खात्री पटलेली नसून तिच्याशी थेट संपर्क झाला नसल्याचे सायमन यांनी म्हटले आहे. ‘‘मला पेंगविषयी खूप चिंता वाटत आहे,’’ असे सायमन म्हणाले.

शुक्रवारी ३५ वर्षीय पेंगची तीन छायाचित्रे तिच्या ‘व्हीचॅट’ खात्यावरून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, चिनी अ‍ॅपवरील या छायाचित्रांची खात्री पटू शकलेली नाही.