वर्षांतल्या पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रां.प्रि. शर्यतीत सहाराच्या फोर्स इंडिया संघाने चांगली कामगिरी केली. मात्र या प्रदर्शनामुळे उत्साहाच्या भरात आगामी शर्यतींमध्ये कामगिरीकडे दुर्लक्ष करणार नाही असे सहारा फोर्सने सांगितले.
ऑस्ट्रेलियन ग्रां.प्रि.मध्ये फोर्स इंडियाने १० गुणांची कमाई केली. संघाच्या अड्रियन सुटिलने सातवे तर पॉल डि रेस्टाने आठवे स्थान पटकावले.
सेपांग येथे आधी झालेल्या तिन्ही शर्यतीत आम्ही चांगले गुण मिळवले होते. गेल्या वर्षी दुहेरी गुणांसह शर्यत पूर्ण केली होती. या वर्षी पहिल्याच ग्रां.प्रि.मधील चांगल्या प्रदर्शनाचा फायदा उठवत हंगामात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे फोर्स इंडियाचे विजय माल्या यांनी सांगितले. हंगामातील आगामी शर्यतींमध्ये फोर्स इंडियाचा संघ कशी कामगिरी करतो याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
 दमदार प्रदर्शनामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येक शर्यतीत, अव्वल संघांना मागे टाकत क्षमतेनुसार चांगले प्रदर्शन करण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल असे त्यांनी पुढे सांगितले.
सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र अजूनही काही ठिकाणी सुधारणा होणे आवश्यक असल्याचे डि रेस्टाने सांगितले. अन्य शर्यतपटूंच्या तुलनेत आम्ही कमी ठिकाणी थांबल्यास आम्हाला फायदा होऊ शकतो असे त्याने पुढे सांगितले. ऑस्ट्रेलियन ग्रां.प्रि.मध्ये पावसाचे आगमन झाले आणि त्याचा मोठा फायदा झाल्याचे सुटिलने सांगितले. सेपांगमध्ये परिस्थिती वेगळी असेल. पाऊस सुरू असताना आघाडी घेणे शक्य असते, मात्र पाऊस नसताना आगेकूच करणे कठीण असल्याचे त्याने स्पष्ट केले.