लंडन : इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेत आम्ही जरी १-४ असा पराभव स्वीकारला असला तरीही संघात आमूलाग्र बदल करण्याइतपत वाईट स्थिती नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

‘‘आम्हाला या मालिकेत जो पराभव स्वीकारावा लागला आहे, त्याची सविस्तर कारणे मला माहीत आहेत. आम्ही प्रत्येक सामन्यात जिद्दीने खेळ केला. जे सामने गमावले, त्या सामन्यांमध्येही आमच्या खेळाडूंनी चिवट लढत दिली आहे हे विसरून चालणार नाही. आम्ही एक सामना जिंकला आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे,’’ असे कोहलीने सांगितले.

भारताला परदेश दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यापाठोपाठ येथेही पराभव झाल्यामुळे परदेशी मैदानांवर भारतीय खेळाडूंच्या मर्यादा पुन्हा स्पष्ट झाल्या आहेत. याबाबत कोहली म्हणाला, ‘‘चौथी कसोटी झाल्यानंतर आम्ही सपशेल हाराकिरी स्वीकारली, असे मी मुळीच म्हणणार नाही. येथील खेळपट्टी व हवामान याचा फायदा इंग्लंडला मिळणार होता याबाबत कोणतीही शंका नव्हती. आम्ही आमच्या क्षमतेइतकी चिवट लढत दिली. संघातील खेळाडूंनी क्षमतेइतकी अव्वल दर्जाची कामगिरी केली नाही. आम्ही विनाकारण दडपण ओढवून घेत खेळ केला. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर आमच्या खेळाडूंनी विनाकारण दडपण घेतले. त्याचाच फायदा इंग्लंडला मिळाला.’’

परदेश दौऱ्यावर असलेला हा गेल्या १५ वर्षांमधील सर्वोत्तम संघ आहे, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले होते. त्याविषयी कोहली म्हणाला, ‘‘शास्त्री यांनी स्वत:चे मत व्यक्त केले होते. याबाबत सविस्तर उत्तर देणे कठीण आहे. संघातील खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेइतकी आणखी चांगली कामगिरी केली असती तर ही मालिका अधिक रंगतदार झाली असती.’’

..तरीही भारत अव्वल स्थानी

लंडन : इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतरही आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवण्यात भारताने यश मिळवले आहे. मात्र पाच कसोटी सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकणाऱ्या इंग्लंडने चौथे स्थान प्राप्त केले आहे. मालिकेआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताच्या खात्यावर १२५ गुण होते, परंतु मालिका गमावल्यानंतर आता गुणसंख्या ११५ अशी झाली आहे. इंग्लंडने मंगळवारी पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत ११८ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा संघ मालिका सुरू होण्यापूर्वी ९७ गुणांसह पाचव्या स्थानावर होता. मात्र मालिकाविजय मिळवल्यामुळे त्यांच्या खात्यावर आणखी ८ गुणांची भर पडली.