पॅरिस : टेनिस इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू असा लौकिक मिळवण्याच्या दृष्टीने नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी महत्त्वाचे पाऊल टाकले. जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडवर विजय मिळवताना कारकीर्दीतील विक्रमी २३व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली. या कामगिरीसह त्याने पुरुषांमध्ये राफेल नदालचा (२२) सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला.

तिसऱ्या मानांकित सर्बियाच्या जोकोव्हिचने अंतिम सामन्यात रुडवर ७-६ (७-१), ६-३, ७-५ अशी मात करताना तिसऱ्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ‘लाल मातीचा बादशाह’ अशी ओळख असणारा १४ वेळचा फ्रेंच स्पर्धेचा विजेता नदाल यंदा दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत जेतेपदाची सुवर्णसंधी जोकोव्हिचने साधली. त्याने उपांत्य फेरीत अग्रमानांकित कार्लोस अल्कराझला पराभूत केले. मग रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात रुडचा सलग तीन सेटमध्ये पराभव केला.

Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

अंतिम सामन्याची रुडने चांगली सुरुवात केली. तो ४-१ असा आघाडीवर होता. मात्र, यानंतर लढवय्या वृत्तीच्या जोकोव्हिचने खेळ उंचावला. त्याने आधी ४-४ अशी बरोबरी साधली. मग दोन्ही खेळाडूंमध्ये ६-६ अशी बरोबरी असल्याने ‘टायब्रेकर’ खेळवण्यात आला. यात अचूक खेळ करताना जोकोव्हिचने ७-१ अशी बाजी मारत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने दमदार खेळ सुरू ठेवताना रुडला पुनरागमनाची संधी दिली नाही. तिसऱ्या सेटमध्ये रुडने झुंज दिली. सुरुवातीला रुडला आपली सव्‍‌र्हिस राखण्यात यश आले. त्यामुळे सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. मात्र, त्याच वेळी जोकोव्हिचने रुडची सव्‍‌र्हिस तोडली, मग आपली सव्‍‌र्हिस राखत स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

नदालकडून अभिनंदन

जोकोव्हिचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडल्यानंतर नदालने त्याचे अभिनंदन केले. ‘‘या यशाबद्दल तुझे अभिनंदन. एखादा खेळाडू २३ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा टप्पा गाठेल असा काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणी विचारही केला नव्हता. मात्र, तू ते करुन दाखवलेस,’’ असे नदालने ‘ट्वीट’ केले.

जोकोव्हिचची जेतेपदे

* ऑस्ट्रेलियन स्पर्धा : १०

* विम्बल्डन : ७

* फ्रेंच स्पर्धा : ३

* अमेरिकन स्पर्धा : ३