पाकिस्तान अ संघाने इमर्जिंग आशिया चषकात भारतीय अ संघाचा ८ विकेट्सने पराभव केला आहे. यासह अ संघाने भारताकडून वरिष्ठ संघाच्या पराभवांचा बदला आहे. पाकिस्तानचा माज सदाकत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना १३६ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तराने पाकिस्तान अ संघाने भारत अ संघाचा ८ विकेट्सने ६ षटकं शिल्लक ठेवत मोठा पराभव केला आहे. यासह, पाकिस्तानी संघाने स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला, तर भारतीय संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन विजयांसह पाकिस्तान शाहीन्स संघाने स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
भारताने दिलेल्या १३७ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १३.२ षटकांत सहज गाठलं. पाकिस्तानकडून सलामीवीर माज सदाकत याने ४७ चेंडूत ७ चौकार व ४ षटकारांसह ७९ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाच्या विजयाचा हिरो ठरला. याशिवाय इतर फलंदाजांनी त्याला साथ दिली. माज सदाकतला एकदा वैभव सूर्यवंशीने झेल सोडल्याने जीवदान मिळालं. तर दुसऱ्या वेळेस तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे सदाकत नाबाद राहिला. यासह त्याने संघाला विजय मिळवून दिला.
भारत अ संघाने प्रथम फलंदाजी केली आणि वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी केली. मागील सामन्यात वादळी शतक झळकावणाऱ्या १४ वर्षीय वैभवने २८ चेंडूत झटपट ४५ धावांची खेळी केली. त्याने फक्त २८ चेंडूत ४५ धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. वैभवने नमन धीरसह ४९ धावांची उत्तम भागीदारी केली. पण इतर फलंदाज अपयशी ठरले.
पाकिस्तानकडून गोलंदाजीत शाहिद अजिजने ३ विकेट्स तर साद मसूद व माद सदाकत यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर उबैद शाह, अहमद दानियल व सुफियान मुकीम यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या.
