येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक आणि भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही देशांदरम्यान २८ ऑगस्ट रोजी सामना रंगणार आहे. त्यामुळे आशिया चषकाबाबत क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच पाकिस्तान संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदी जखमी झाला आहे.

पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही खेळू शकला नव्हता. आशिया चषकापूर्वी नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याची निवड तर झाली आहे. मात्र, त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. ‘नेदरलँड्समध्ये शाहीनला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे,’ अशी माहिती संघाचा कर्णधार बाबर आझमने दिली आहे.

हेही वाचा – आपल्या आवडत्या मैदानावर युझवेंद्र चहलने पुन्हा दिली ‘ती’ पोझ

शाहीन आफ्रिदी पाकिस्तानचा प्रमुख आणि महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. गेल्यावर्षी (२०२१) झालेल्या टी २० विश्वचषकात खेळल्या गेलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात शाहीनने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले होते. त्याने केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्माला बाद केले होते. त्यामुळे त्याची संघातील उपस्थिती आणि अनुपस्थिती दोन्हीही पाकिस्तानच्या संघासाठी महत्त्वाची आहे. आशिया चषकापूर्वी जर तो तंदुरुस्त नाही झाला तर, पाकिस्तानसाठी ही बाब घातक ठरू शकते.

दरम्यान, आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. हा सामना दुबई येथे होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. ग्रुप स्टेजच्या सामन्यांनंतर ‘सुपर फोर’ टप्पा असेल आणि सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. त्यानंतर काहीच दिवसांच्या अंतरानंतर टी २० विश्वचषकामध्ये दोन्ही संघ पुन्हा एकमेकांच्या समोरासमोर येतील.