पीटीआय, अहमदाबाद

मयांक यादवच्या प्रभावी माऱ्यासमोर निष्फळ झालेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांसमोर गुरुवारी मोटेराच्या धिम्या खेळपट्टीवर ‘आयपीएल’ सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचे आव्हान असणार आहे.

पंजाबला गेल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच गुजरातविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यास संघाच्या अडचणी वाढू शकतात. दुसरीकडे, गुजरातने गेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघावर सात गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर खेळताना गुजरातचे पारडे जड समजले जात आहे. पंजाबला या सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास संघाला सर्वच विभागांत चमकदार कामगिरी करावी लागेल. विशेष करून त्यांच्या फलंदाजांकडून सर्वाधिक योगदान अपेक्षित असेल.

हेही वाचा >>>IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा

बेअरस्टो, करनकडून अपेक्षा

पंजाब संघाकडे गेल्या सामन्यात मयांक यादवच्या वेगवान माऱ्याचे उत्तर नव्हते. मयांकसमोर फलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांना अडचणी येत होत्या. अनुभवी गोलंदाज मोहित शर्मासमोरही पंजाबला अशाच आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शिखर धवन, जॉनी बेअरस्टो व सॅम करनसारख्या फलंदाजांचा चांगला कस लागेल. गेल्या सामन्यात लिआम लिव्हिंगस्टोनला दुखापत झाली होती. गुजरातविरुद्ध तो मैदानात उतरला नाही, तर पंजाबच्या अडचणी वाढू शकतात. पंजाबला त्यांच्या गोलंदाजीबाबत अधिक चिंता आहे. विशेष करून अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. हर्षल पटेलने सध्याच्या सत्रात आपल्या गोलंदाजीने निराशा केली आहे. त्याने सर्व सामन्यांत चार षटके पूर्ण केली असली, तरीही भरपूर धावा दिल्या आहेत. राहुल चहरलाही आपल्या फिरकीने प्रभाव पाडता आलेला नाही. तसेच, भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला अपेक्षानुसार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पंजाबच्या अडचणी वाढल्या आहेत.

रशीद, मिलरकडे नजर

गुजरातने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चमकदार कामगिरी करताना आपली छाप पाडली. फलंदाजांना मात्र, एकत्रितपणे चांगली कामगिरी करता आलेली नाही. संघाकडे शुभमन गिल व अनुभवी वृद्धिमान साहाच्या रूपाने चांगले सलामीवीर आहेत. तसेच, जलदगतीने धावा करण्यासही सक्षम आहेत. संघाकडे अनुभवी रशीद खान व नूर अहमदच्या रूपाने चांगले फिरकीपटू आहेत.

वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.