पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांचे मत
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिका होण्याची शक्यता धूसर असून याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढाकार घ्यायला हवा, असे मत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले.

बऱ्याच कालावधीपासून पीसीबी बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पाहत असून अजूनही त्याबाबत कोणतेच ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. पीसीबीला हे योग्य वाटत नाही. त्याचबरोबर सध्याच्या घडीलाही याबाबत बैठक न झाल्याने पीसीबीमध्ये नाराजीचा सूर आहे.
शहरयार हे दिल्लीमध्ये असून भारताच्या काही मोठय़ा मंत्र्याबरोबर त्यांची चर्चा होऊ शकेल, अशी आशा आहे. पीसीबीला दोन्ही देशांमध्ये पुन्हा क्रिकेट सुरू व्हावे असे वाटत असले तरी त्यांना याबाबत सकारात्मक उत्तर अजूनही मिळू शकलेले नाही.

‘‘भारत-पाक मालिकेबद्दल मी आशावादी आहे. याबाबत बरेच दडपण असून यापुढे नेमके काय होईल, हे सांगता येणे कठीण आहे. सध्याच्या घडीला तरी या मालिकेची शक्यता धूसर आहे. सध्याच्या घडीला प्रयत्न करणे थांबवले असून बीसीसीआय याबाबत पुढाकार घेते का, हे पाहावे लागेल,’’ असे शहरयार खान म्हणाले.

कोणते आणि कशा प्रकारचे दडपण वाढत आहे, याचा खुलासा करणे शहरयार यांनी टाळले. या मालिकेबाबत ते पुढे म्हणाले की, ‘‘यापुढे दोन्ही मंडळांमध्ये कुठलीच बैठक होणार नाही. ही मालिका होणार नाही, याची अधिकृत माहिती आम्हाला मिळेल, त्या वेळी आम्ही अन्य पर्यायांचा विचार करू. एका हाताने टाळी वाजत नाही.’’

शशांक मनोहर यांच्याबरोबरच्या बैठकीबाबत शहरयार खान म्हणाले की, ‘‘मनोहर यांनी मला सोमवारी बैठकीसाठी मुंबईला बोलावले होते. रविवारी रात्री मी मुंबईला पोहोचलो. पण बैठकीच्या अध्र्या तासापूर्वी त्यांनी मला ही बैठक पुढे ढकलली जात असल्याचे सांगितले. मी संध्याकाळपर्यंत त्यांच्या संदेशासाठी वाट पाहिली, पण काहीच झाले नाही.’’
येथे पोहोचल्यावर शहरयार खान यांनी आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांची भेट घेतली.

‘‘बीसीसीआयशी संलग्न असलेल्या व्यक्तींशी चर्चा करण्यासाठी मी येथे आलो आहे. पण बीसीसीआयकडून मात्र कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही. त्यामुळे मी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्ला यांच्याबरोबर माझा बऱ्याच वर्षांपासून परिचय असून आमच्यामध्ये या मालिकेबाबत चर्चा झाली नाही,’’ असे शहरयार यांनी सांगितले.

’शहरयार जेटली यांना भेटणार
भारताबरोबर क्रिकेट मालिका होण्याची शक्यता धूसर झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख शहरयार खान हे केंद्रीय परराष्ट्रमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘‘मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे प्रमुख नजाम सेठी हे दुबई येथे रवाना झाले आहेत. भारताबरोबरच्या मालिकेसाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळविण्यासाठी मी जेटली यांची भेट घेण्याचा प्रयत्न करीत आहे,’’ अशी माहिती शहरयार यांनी दिली. भारत व पाकिस्तान यांच्यात डिसेंबरमध्ये मालिका आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र शिवसेनेच्या समर्थकांनी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांना घेराव घातला होता. त्या पाश्र्वभूमीवर खान यांना जास्त सुरक्षा व्यवस्था दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून खान यांच्या हालचालींवर दिल्ली पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

’राजीव शुक्लांबरोबरही खान यांची चर्चा
भारत-पाकिस्तान मालिकेच्या पाश्र्वभूमीवर शहरयार यांनी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांचीही भेट घेतली. ही भेट वैयक्तिक स्वरूपाची असली, तरी त्यामध्ये संभाव्य मालिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना संधी देण्याबाबत शहरयार यांनी विनंती केल्याचे समजते. या बैठकीबाबत शुक्ला म्हणाले, ‘‘मालिकेबाबत चर्चा झाली, मात्र ही वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे जेव्हा दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष चर्चा होईल, तेव्हाच या मालिकेबाबत सविस्तर समजू शकेल. शिवसेनेच्या समर्थकांना आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती. मंडळाच्या कार्यालयात घुसून त्यांनी केलेले वर्तन अयोग्य होते.’’

’नजम सेठी दुबईला रवाना
भारताबरोबर मालिकेची शक्यता धूसर झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळावरील दडपण वाढले असून, मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे प्रमुख नजम सेठी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी दुबईला रवाना झाले आहेत. मंडळाच्या जनसंपर्क विभागाचे संचालक अमजद भट्टी यांनी सांगितले, ‘‘बीसीसीआयच्या कार्यालयावर झालेल्या निदर्शनांनंतर नजम यांनी दुबईस जाण्याचा निर्णय घेतला, तर शहरयार खान हे मुंबईहून दिल्लीला गेले आहेत. खान हे बुधवापर्यंत तेथे थांबणार आहेत. मनोहर यांनी दिलेल्या निमंत्रणामुळेच खान व नजम हे मुंबईस गेले होते. उभय देशांमधील क्रिकेट मालिकेला पुन्हा सुरुवात व्हावी, अशी दोन्ही मंडळांची इच्छा असल्यामुळेच खान यांनी मनोहर यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईत झालेल्या निदर्शनांमुळे पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे.’’