दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुनियोजित रणनीती आखत गैरव्यवहाराचे पुरावे मिळवले आणि आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. त्यानुसार राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, फिरकीपटू अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना मुंबईत विविध ठिकाणी अटक करण्यात आली.
‘‘एक षटक टाकण्यासाठी या तिघांना ६० लाख रुपये दिल्याचा आरोप पोलिसांनी केला असून, या प्रकरणात खेळाडूंचा सट्टेबाजांशी आणि सट्टेबाजांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे,’’ असे दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
‘‘आम्ही एप्रिलपासूनच या खेळाडूंच्या मागावर होतो आणि त्यांच्या हातून चुका घडून आम्हाला पुरावे कसे मिळतील, याची वाट पाहात होतो. आता फक्त १४ जणांना अटक करण्यात आली असली तरी अजूनही काही भारतीय आणि विदेशी खेळाडू प्रकाशझोतात आले नाहीत. या गैरव्यवहाराचे ‘दृक-श्राव्य’पुरावे आमच्याकडे आहेत. या प्रकरणात मुंबईतील अंडरवर्ल्डचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे,’’ असे कुमार म्हणाले.
या प्रकरणात कुख्यात अंडरवर्ल्ड ‘डॉन’ दाऊद इब्राहिमचा हात आहे का, असे विचारल्यावर कुमार म्हणाले की, ‘‘कोणाविरुद्ध पुरावे हातात नसताना आरोप करणे किंवा नाव घेणे चुकीचे ठरेल. पण या प्रकरणात मुंबईबरोबरच विदेशातील काही लोकांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे.’’

पाच दिवसांची पोलीस कोठडी
नवी दिल्ली : स्पॉट-फिक्सिंग आरोपातील एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या क्रिकेटपटूंना गुरुवारी संध्याकाळी दिल्लीतील साकेत जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिघांचे चेहरे कपडय़ाने बांधलेले होते. न्यायाधिशांच्या निवासस्थानाजवळ जाण्यास प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला होता. या आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी आशा दिल्ली पोलिसांना होती. अखेर न्यायालयाने श्रीशांतसह अन्य १३ आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली.

पोलिसांची कारवाई
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात तीन खेळाडूंसह एकूण १४ जणांना अटक दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे. या १४ जणांवर भारतीय दंड विधेयक कलम ४२० (फसवणूक) आणि १२० ब (गुन्हेगारी कट) या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. यांच्यावर ‘मोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरुद्ध कायदा) लावण्याचा विचारही पोलीस करत आहे. जर त्यांच्यावर ‘मोका’ लावण्यात आला तर त्यांना जामीन न मिळता तुरुंगात जावे लागेल.

मध्यरात्रीचे अटकसत्र
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यानंतर बुधवारी मध्यरात्री मुंबईत तिन्ही खेळाडूंना अटक करण्यात आली. श्रीशांत सामन्यांनतर वांद्रे येथील कार्टररोड येथील आपल्या निवासस्थानी जातो, असे सांगून निघाला होता. सुरुवातीला तो वांद्रे येथील ‘ओ-जी’ या पबमध्ये गेला. तेथे तो निपलानी नावाच्या बुकीला भेटला. याच पबमध्ये त्यांचे व्यवहार झाले. यानंतर श्रीशांत आणि निपलानी रॉयल्टी पबकडे निघाले. त्याच्या गाडीत त्यावेळी तीन तरुणीही होत्या. मध्यरात्री दीडच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी श्रीशांत आणि निपलानीला अटक केली. काही सट्टेबाज इंटर कॉन्टिनेन्टल या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते, तिथून चंडिलाला अटक करण्यात आली, तर राजस्थानचा संघ उतरलेल्या ट्रायडेंट हॉटेलमधून चव्हाणला ताब्यात घेण्यात आले.

खेळाडू आणि बुकींची निशाणेबाजी
‘स्पॉट-फिक्सिंग’ केव्हा करायची याची निशाणेबाजी खेळाडू आणि बुकींमध्ये व्हायची. खेळाडूने पॅन्टमध्ये टॉवेल खोचला किंवा क्षेत्ररक्षण व्यूहरचना करण्यात वेळखाऊपणा केला किंवा खोचलेला टी-शर्ट बाहेर काढला किंवा पॅन्ट कंबरेमधून हलवली तर बुकींना ‘स्पॉट फिक्सिंग’चा इशारा मिळायचा.

श्रीशांतवर आजीवन बंदीची टांगती तलवार
नवी दिल्ली : आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सापडलेला केरळचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतच्या डोक्यावर आजीवन बंदीची टांगती तलवार आहे. सध्या बीसीसीआयचे क्रिकेटधुरिण दिल्ली पोलिसांच्या तपासणीकडे लक्ष ठेवून आहे. परंतु श्रीशांत दोषी आढळल्यास त्याला देशातील कोणत्याही स्तरावरील क्रिकेट खेळण्यापासून मज्जाव करण्यात येईल, अशी चिन्हे आहेत. बीसीसीआयच्या लाचलुचपत विभागाचे प्रमुख रवी सवाई स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. ते पुढील ३० दिवसांत शिस्तपालन समितीचे प्रमुख अरुण जेटली यांच्याकडे आपला अहवाल सादर करतील, असे बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

बीसीसीआयकडून तिघांवर निलंबनाची कारवाई
नवी दिल्ली : एस. श्रीशांत, अंकित चव्हाण व अजित चंडिला या तीन खेळाडूंवर चौकशी चालू असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या खेळाडूंसंदर्भात सर्व तपासणी करण्यात येणार असून, ते दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. ताज्या घडामोडीमुळे बीसीसीआयला धक्का बसला आहे. लाचलुचपतप्रकरणी बीसीसीआय कुणाचीही गय करणार नाही. या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात आम्ही दिल्ली पोलीस व संबंधित विभागांना संपूर्ण सहकार्य करू. आयपीएलच्या कार्यकारिणी समितीची बैठक झाली असून, स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या मार्गदर्शनाखाली बीसीसीआयमधील हा विभागसुद्धा आता खेळाडूंवर नजर ठेवून आहे.
-संजय जगदाळे (बीसीसीआयचे सचिव)

एअर इंडियाकडून चंडिला, अंकित निलंबित
नवी दिल्ली : अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’च्या आरोपाखाली पकडण्यात आल्यानंतर एअर इंडियाने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. ‘‘आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला एखाद्या गुन्ह्य़ाखाली पोलिसांनी अटक केली, तर त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येते. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असल्यामुळे आम्ही या प्रकरणी काहीही करू शकत नाही तसेच कोणतीही चौकशी समिती नेमू शकत नाही,’’ असे एअर इंडियाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांचा सापळा
राजस्थान रॉयल्सचे खेळाडू ‘स्पॉट-फिक्सिंग’ करत असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आला होता. त्यासाठी त्यांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. राजस्थानच्या ५ मेच्या पुणे वॉरियर्स, ९ मेच्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि १५ मेच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यावर हे पथक स्टेडियममधूनच लक्ष ठेवून होते.
*  पुण्याच्या सामन्यात दुसऱ्या षटकात १४ धावा देण्याचे चंडिलाला सांगण्यात आले होते आणि त्यासाठी सट्टेबाजांनी ४० लाख रुपये मोजले होते. त्याने १४ धावा दिल्याही, पण या सामन्यापूर्वी चंडिलाने सट्टेबाजांना कोणताच इशारा न दिल्याने त्याला ही रक्कम त्यांना परत करावी लागली होती.
*  या सामन्यापूर्वीचे चंडिला आणि सट्टेबाज अमित कुमार यांच्या संभाषणाचा पुरावा पोलिसांकडे आहे. चंडिलाला टी-शर्ट वर करून सटेटबाजांना निशाणा द्यायचा होता, पण ते करायला तो विसरला. यानंतर किंग्ज इलेव्हन विरुद्धच्या सामन्यात दुसरे षटक टाकण्यापूर्वी श्रीशांतने पॅन्टमध्ये टॉवेल खोचून सट्टेबाजांना इशारा दिला होता. यावेळी श्रीशांतचा जवळचा मित्र जिजू जनार्दन सट्टेबाजांच्या संपर्कात होता.
*  दुसऱ्या षटकात १४ धावांचा करार झालेला असला तरी श्रीशांतने या षटकात १३ धावा दिल्या. ही चूक मोठय़ा स्वरुपाची नसल्याने त्याला ठरलेली रक्कम देण्यात आली.
*  मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चंडिला खेळत नसला तरी तो अंकित चव्हाण आणि सट्टेबाज यांच्यामधील मध्यस्थ होता. अंकितला एका षटकात १३पेक्षा अधिक धावा देण्यासाठी ६० लाख रुपये मोजण्यात आले. अंकितने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंमध्ये १४ धावा दिल्या आणि अखेरच्या तीन चेंडूंमध्ये फक्त एक धाव दिली होती. सट्टेबाजांना मनगटी पट्टा हलवून इशारा द्यायचा होता, असे अंकितनेच सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वीचे ‘स्पॉट-फिक्सिंग’
१. २०१० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघातील सलमान बट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आरिफ यांनी ठरवून ‘नो-बॉल’ टाकले. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यामुळे बटवर दहा वर्षांची, आसिफवर सात तर आमिरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली.
२. इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये एसेक्स संघातील दोन खेळाडूंना ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने पकडले. त्यापैकी पाकिस्तानच्या दिनेश कनेरियावर आजीवन तर मर्विन वेस्टफिल्डवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली.
३. आयपीएलच्या पाचव्या मोसमात (२०१२) मोहनिश मिश्रा, शलभ श्रीवास्तव, टी. पी. सुधींद्र, अमित यादव आणि अभिनव बाली यांच्यावर  ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी बंदी घालण्यात आली.
४. आयपीएलच्या सहाव्या मोसमात (२०१३)  ‘स्पॉट-फिक्सिंग’च्या आरोपाखाली गुरुवारी एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना अटक करण्यात आली.