PM Narendra Modi on Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून टाचेच्या दुखापतीने त्रस्त होता. स्पर्धेदरम्यान, त्याने औषधांच्या माध्यमातून त्याच्या वेदनांवर नियंत्रण ठेवले आणि भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. २२ फेब्रुवारीला हा अनुभवी गोलंदाज टाचेच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला रवाना झाला होता. सोमवारी त्याच्या टाचेची शस्त्रक्रिया यशस्वी झाली, याविषयीची माहिती खेळाडूने ट्विट करून दिली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी शमीला दिल्या शुभेच्छा –

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर शमीची पोस्ट रिट्विट करताना लिहले, “तुम्ही लवकर बरे व्हावे आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. मला विश्वास आहे की तुम्ही या दुखापतीवर धैर्याने मात कराल, जी तुमच्यासाठी अविभाज्य आहे.” यानंतर मोहम्मद शमीनेही त्यांचे आभार मानले.

मंगळवारी मोहम्मद शमीने लंडनमध्ये टाचेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची सांगितले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही फोटो शेअर करताना शमीने लिहिले, ‘माझ्या अकिलीस टेंडन टाचेची नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे! बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर उभा राहण्यास उत्सुक आहे.” शमी २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यापासून मैदानापासून दूर आहे. पहिले इंजेक्शन घेतल्यावर तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून शस्त्रक्रिया करण्यात आली.

हेही वाचा – Elena Norman : एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय

विश्वचषकात केली होती चांगली कामगिरी –

गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने दमदार प्रदर्शन करताना स्पर्धेत सर्वाधिक २४ बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने मायदेशात खेळल्या गेलेल्या या विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अलीकडेच मोहम्मद शमीलाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचवेळी आता तो लवकरात लवकर मैदानात परतेल, अशी आशा शमीसह चाहत्यांना आहे.

हेही वाचा – VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

गुजरात टायटन्सला बसला मोठा धक्का –

मोहम्मद शमी आयपीएल २०२४ मध्ये न खेळणे हा गुजरात टायटन्स संघासाठी निश्चितच मोठा धक्का आहे. यावेळी आयपीएलमध्ये शुबमन गिल गुजरात टायटन्सचे कर्णधारपद सांभाळणार आहे. गेल्या मोसमात गुजरातचा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला होता, मात्र चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई सुपर किंग्जने गुजरातला हरवून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.