उत्कंठापूर्ण लढतीत पाटणा पायरेट्सने पूर्वार्धातील १९-२३अशा पिछाडीवरून तेलुगू टायटन्सवर ३८-३५ अशी मात केली आणि प्रो-कबड्डी लीगमध्ये विजयाची बोहनी केली. मात्र पुणेरी पलटण संघाने बंगाल वॉरियर्सकडून ३८-३५ असा पराभव स्वीकारला.
साखळी गटातील दुसऱ्या सामन्यात पाटणा संघाने उत्तरार्धात वेगवान चढायांबरोबरच सुरेख पकडी करीत विजयश्री खेचून आणली. त्याचे श्रेय रवी दलाल (१४ गुण) व कर्णधार राकेश कुमार (७ गुण) यांना द्यावे लागेल. त्यांचा पाकिस्तानी सहकारी वासिम सज्जडने उत्कृष्ट पकडी करीत सर्वोत्तम बचावरक्षकाचे बक्षीस मिळविले. तेलुगू संघाकडून दीपक हुडा व राहुल चौधरी यांची लढत अपुरी ठरली. पाटणा संघाचे आता दुसऱ्या सामन्याअखेर सहा गुण झाले आहेत तर तेलुगू संघ तीन सामन्यांनंतर चार गुणांवर आहे.
अन्य लढतीत विलक्षण चुरस पाहायला मिळाली. बंगाल संघाने पूर्वार्धात २०-१४ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात पुण्याच्या वझिर सिंग (९ गुण) व महिपाल नरवाल (१० गुण) यांनी २७-२७ अशी बरोबरी साधली. मात्र शेवटची तीन मिनिटे बाकी असताना बंगालच्या सुनील जयपाल याने एकाच चढाईत तीन गुण वसूल करीत पुन्हा बंगालकडे आघाडी घेतली. हीच आघाडी कायम ठेवत त्यांनी विजय मिळविला. बंगालकडून जंग कुन ली (१४ गुण), सुनील जयपाल व महेश गौड (प्रत्येकी ५ गुण) यांना द्यावे लागेल. बंगालने चार सामन्यांमध्ये दहा गुण मिळविले आहेत.