देशात क्रिकेटनंतर सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या प्रो-कबड्डीने आता आयपीएलच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं ठरवलं आहे. सहाव्या हंगामाच्या लिलावासाठी प्रो-कबड्डीमध्ये आयपीएलप्रमाणे राईट टू मॅच कार्ड वापरलं जाणार आहे.

राईट टू मॅच कार्ड म्हणजे नेमकं काय??

एखाद्या हंगामात विशिष्ट संघाने कोणत्याही खेळाडूला आपल्या संघात कायम राखलेलं नसेल, मात्र लिलावादरम्यान इतर संघाने त्या खेळाडूला आपल्या संघात दाखल करुन घेतलं तर त्या खेळाडूच्या आधीच्या संघमालकाला राईट टू मॅच कार्डाद्वारे तो खेळाडू परत मिळवता येतो. यासाठी लिलावात त्या खेळाडूवर लागलेली रक्कम संघमालकाला द्यावीच लागते.

उहारहणार्थ यू मुम्बा संघाने सहाव्या हंगामासाठी कोणत्याही खेळाडूला आपल्या संघात कायम राखलेलं नाहीये. मात्र लिलावादरम्यान पुणेरी पलटण संघाने अनुप कुमार या खेळाडूवर ७५ लाखांची बोली लावली, तर यू मुम्बा संघाला अनुप कुमारला आपल्या संघात कायम राखण्यासाठी राईट टू मॅच कार्डाद्वारे एक संधी दिली जाते. यावेळी राईट टू मॅच कार्ड उंचावत संघमालक त्या खेळाडूवर आपला दावा सांगू शकतो. यासाठी यू मुम्बाला अनुप कुमारसाठी ७५ लाखांची रक्कम मोजावी लागेल.

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात हा नियम पहिल्यांदाच लागू करण्यात आलेला आहे. बिड टू मॅच या नावाने ही प्रक्रिया पार पडली जाणार आहे. १९ ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. सहाव्या हंगामासाठी महत्वाच्या संघांनी एकाही खेळाडूला कायम न राखता नव्याने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राईट टू मॅच कार्डाद्वारे कोणता संघ कोणत्या खेळाडूला संघात कायम राखतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.