scorecardresearch

नरवाल आडनावामागे दडलेय काय?

हरयाणातील सोनीपतजवळ रिंढाना नावाचे गाव कबड्डीसाठी विशेष ओळखले जाते.

नरवाल आडनावामागे दडलेय काय?

प्रो कबड्डी लीग सुरू झाल्यापासून बहुतेक क्रीडारसिकांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे हे नरवाल आडनावाचे एवढे खेळाडू नेमके आले कुठून? प्रो कबड्डीमधील बऱ्याच संघांकडून हे नरवाल आडनावाचे खेळाडू चमकताना दिसू लागल्यामुळे ते साऱ्यांच्याच कुतूहलाचा विषय झाले होते. मात्र जयपूर पिंक पँथर्सकडून खेळणाऱ्या राजेश नरवालने या आडनावामागे दडले आहे काय, याचा रहस्यभेद केला आहे. हरयाणातील सोनीपतजवळ रिंढाना नावाचे गाव कबड्डीसाठी विशेष ओळखले जाते. गावामध्ये कबड्डीसाठी पोषक वातावरण असून प्रत्येक घरातील मुलगा कबड्डीपटू होण्याचा विचार करतो. हे सारे नरवाल रिंढाना गावचेच, अशी माहिती राजेशने दिली आहे.
आपल्या गावातील खेळाडूंबद्दल राजेश सांगतो, ‘‘लहानपणापासून मी कबड्डी पाहात आलो, त्यामुळे यामध्येच कारकीर्द घडवण्याचा विचार लहानपणापासून माझ्या मनात होता. आतापर्यंत माझ्या गावातील २० खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळले आहेत, तर प्रो कबड्डीमध्ये सध्या गावातील दहा खेळाडू खेळत आहेत.’’
जयपूर संघामध्येही सोनू नरवालसारखा होतकरू खेळाडू आहे. त्याच्याबाबत राजेश म्हणाला की, ‘‘सोनू हा एक चांगला चढाईपटू आहे. या मोसमातील तो सर्वोत्तम चढाईपटूंपैकी एक आहे. मी आणि सोनू यांच्याकडून चांगला खेळ झाला आहे. पण फक्त आम्हा दोघांमुळेच संघ जिंकत नाही, तर यामध्ये सर्वच खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे आहे.’’
जयपूरमध्ये चांगली संघभावना
आमच्या संघामध्ये चांगली संघभावना आहे. कर्णधार नवनीत गौतम, जसवीर सिंग, सी. अरुण आणि कुलदीप सिंग हे जायबंदी आहेत, पण तरीही संघाला विजय मिळवून देण्यासाठी कसलीही पर्वा न करता ते मैदानात उतरतात. त्यांच्या खेळण्याने संघाचे मनोबल उंचावते आणि निश्चितच त्याचा फायदा आम्हाला होतो.

आता ध्येय भारतीय संघाचे
प्रो कबड्डीमुळे मला प्रसिद्धी मिळाली, पण अजून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. भारतीय संघातून खेळण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी अथक मेहनत घेत आहे. यापूर्वी मी आंतरराष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेमध्ये खेळलो होतो. पण भारताकडून कधी आशियाई स्पर्धामध्ये मी खेळू शकेन, याची उत्सुकता आहे. प्रो कबड्डीमध्ये चांगली कामगिरी होत असून याचा फायदा मला त्यासाठी नक्कीच होईल.

क्रिकेटपटूंसारखा सन्मान मिळतो
प्रो कबड्डीमुळे आमच्यासारख्या खेळाडूंना क्रिकेटपटूंसारखा सन्मान मिळायला लागला आहे. चाहते आमच्यासोबत छायाचित्रे आणि सेल्फी काढतात, स्वाक्षरी घेतात. कार्यक्रमाच्या उद्घाटनालाही आम्हाला बोलवले जाते. हे सारे पाहून मन भरून येते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या