चेतेश्वर पुजाराकडे क्रिकेटसाठीचे आवश्यक मूलभूत तंत्र आहे आणि त्यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही संधी मिळायला हवी, असे उद्गार भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी काढले. पुजाराने अहमदाबाद कसोटीत इंग्लंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला होता. त्याविषयी गावस्कर म्हणाले, ‘‘पुजाराचे तंत्र चांगले आहे. आतापर्यंतच्या सामन्यात त्याने हे दाखवून दिले आहे. त्यामुळे त्याला एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही संघात संधी द्यायला हरकत नाही. मर्यादित षटकांसाठी फटके खेळण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असते. पुजाराचे तंत्र उत्तम आहे, त्यामुळे ही क्षमता विकसित करण्यास त्याला वेळ लागणार नाही. कसोटीच्या तुलनेत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सहजतेने फटके खेळता येतात. तो केवळ आत्मविश्वासाचा मुद्दा आहे. तो जमिनीलगत फटके सुरेखपणे मारतो आणि चौकारही वसूल करू शकतो, त्यामुळे मर्यादित षटकांच्या सामन्यातही तो यशस्वी होऊ  शकतो.’’