पीटीआय, वॉरसॉ

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सुपरबेट जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्सन कार्लसनवर मात केली. मात्र, या विजयानंतरही तो तिसऱ्या स्थानीच राहिला. कार्लसनच्या पराभवामुळे गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या चीनच्या वे यीची आघाडी आता २.५ गुणांनी वाढली आहे.

या स्पर्धेतील अतिजलद प्रकाराच्या नऊ फेऱ्या शिल्लक असून वे यी एकूण २०.५ गुणांसह अग्रस्थानावर आहे. अतिजलद प्रकारात पहिल्याच दिवशी त्याने नऊपैकी सात लढतींत विजय नोंदवले. जलद प्रकारातही तोच विजेता ठरला होता. त्याला रोखणे अन्य बुद्धिबळपटूंना आता अवघड जाणार आहे. ही स्पर्धा ग्रँड चेस टूरचा भाग आहे.

हेही वाचा >>>RCB vs DC : रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने नोंदवला सलग पाचवा विजय, ४७ धावांनी उडवला दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा

कार्लसन आता १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. प्रज्ञानंदकडून झालेल्या पराभवामुळे तो अग्रस्थानापासून आणखीच दूर गेला आहे. अतिजलद प्रकारात प्रज्ञानंद कार्लसनविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करताना दिसतो. कार्लसनवरील विजयानंतर प्रज्ञानंदचे १४.५ गुण झाले आहेत. भारताचाच अर्जुन एरिगेसी १४ गुणांसह चौथ्या, तर पोलंडचा यान-क्रिस्टोफ डुडा १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्याखालोखाल नोदिरबेक अब्दुसत्तोरोव (१२.५ गुण), व्हिन्सेन्ट केमेर (११.५), किरिल शेवचेन्को (११) आणि अनिश गिरी (१०.५) यांचा क्रमांक लागतो.

जगज्जेतेपदाच्या लढतीसाठीचा आव्हानवीर असलेल्या भारताच्या डी. गुकेशला मात्र या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. तो ९.५ गुणांसह गुणतालिकेत तळाला आहे. त्याने अग्रस्थानी असलेल्या वे यीवर विजय मिळवला, पण त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्याने अतिजलद प्रकाराच्या पहिल्या दिवशी नऊ लढतींत मिळून केवळ २.५ गुण मिळवले. गुकेश आणि प्रज्ञानंद यांना एरिगेसीकडून पराभव पत्करावा लागला.